शिवरायांविषयीचा आदर गाड्यांमागील चित्रातून नव्हे तर तुमच्या कर्तृत्वातून दिसायला हवा – राहुल सोलापूरकर
पुणे : शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात असली पाहिजे. मोटार सायकल, कारच्यामागे शिवरायांची प्रतिमा काढून महाराजांना स्वस्त करू नका, शिवराय हे मनात असले पाहिजेत आणि महाराजांचे कर्तृत्व हे आपल्या विचारातून बाहेर आलेले दिसले पाहिजे. तुम्ही बोलताना शिवाजी महाराजांना आदर्श मानता हे लक्षात आले पाहिजे आणि तुमच्या कर्तृत्वातून ते दिसायला पाहिजे, असे मत अभिनेते आणि व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळाच्या वतीने शिवसूर्य स्मरणिका प्रकाशन आणि शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऍड. सतीश गोरडे, प्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, खजिनदार सचिन भोसले, उत्सव प्रमुख दत्ता काळे, कृष्णा परदेशी उपस्थित होते.
राहुल सोलापूरकर म्हणाले, शिवरायांविषयीचे बरेचसे कागदपत्र अजूनही आपल्याला ज्ञात नाहीत. जास्तीत जास्त महाराजांची कागदपत्रे ब्रिटिशांकडे आहेत. ब्रिटिशांनी इतिहास जपून ठेवला आपल्याकडे दुर्दैवाने तिची जपणूक करण्याची पद्धत नाही. ब्रिटिशांकडून जे घ्यायला हवे होते ते आपण घेतलं नाही. पण नको त्या गोष्टी घेतल्या, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
ऍड. सतीश गोरडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय चारित्र्यसंपन्न राजे होते. त्याची आज प्रत्येकाला गरज आहे समाजामध्ये, राजकारणामध्ये, घरात, मंडळाचे काम करताना महाराजांसारखे चारित्र्य जपणारी माणसे निर्माण व्हायला हवीत.
किशोर चव्हाण म्हणाले, शिवरायांची जयंती घराघरात साजरी व्हावी याकरीता मंडळाच्या वतीने छत्रपती शिवरायांची प्रतिमा(मूर्ती) घरोघरी भेट देण्यात आली आहे. मंडळाचा कार्यकर्ता मूर्ती भेट देण्यासाठी गेला असता माता-भगिनींनी पारंपारिक पध्दतीने औक्षण करुन स्वागत केले जात आहे. प्रत्यक्ष शिवजयंतीच्या दिवशी पारंपारिक पध्दतीने शिवजयंती साजरी होईल व घरोघरी शिवचरित्राचे वाचन होईल यासाठी मंडळाच्या माध्यमातून जागृती करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. विजय चौधरी, निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार नाईक यांनी आभार मानले.