पुणे महानगरपालिका प्रशासकपदी आयुक्त विक्रम कुमार, अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश
पुणे : पुणे महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नागरिकांना त्यांच्या नागरी सुविधांबाबत प्रश्न,गाऱ्हाणी तसेच इतर तक्रारीकरिता अधिकारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. पार्श्वभूमीवर महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत.
आज महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. सर्व खाते प्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपायुक्त परिमंडळ 1 ते 5 यांनी सोमवार ते गुरुवार सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत आपल्या कार्यालयात हजर राहून नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकून त्यांचे निवारण करावे. तसेच सर्व महापालिका सहाय्यक आयुक्तांनी दररोज सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत आपल्या कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकून त्याचे निवारण करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेची विद्यमान मुदत 14 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली आहे. महापालिका निवडणुका अद्याप घोषीत झालेल्या नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने घेतला आहे. पुणे महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
