मुंडगावकर ज्वेलर्स फसवणूक प्रकरणी गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार
मालमत्तांची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना रक्कम परत करणार
मुंबई : अकोला येथील मुंडगावकर ज्वेलर्स, न्यू मुंडगावकर ज्वेलर्स, श्री.मुंडगावकर ज्वेलर्सच्या प्रोप्रायटर यांच्याकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना आता आपल पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंडगावकर कुटुंबातील व्यक्तिच्या स्थावर मालमत्तांची विल्हेवाट लावून त्यातून आलेली रक्कम या गुंतवणूकदारांना वितरित करण्यात येणार आहे. अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना दिली
राज्यमंत्री देसाई म्हणाले, व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या ४२७ तक्रारी दाखल झाल्या असून १६ कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी २ आरोपींची निष्पन्न झालेली स्थावर मालमत्ता संरक्षीत करण्यात आली आहे. तर उर्वरित जणांची मालमत्ता निष्पन्न करून त्यास संरक्षित करण्यात येईल. या मालमत्तेच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या वतीने सक्षम प्राधिकारी नियुक्ती करण्यात येईल. त्यामार्फत या मालमत्तांची विल्हेवाट लावून आलेली रक्कम गुंतवणूकदारांना वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
