Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

महापाैर कार्यालयात शाईफेक प्रकरणी वंचितच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पुणे महापाैर कार्यालयात शाईफेक केल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या चार कार्यकर्त्यांवर पाेलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण पुन्हा एकदा रंगू लागले असल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते पुणे महानगर पालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे 6 मार्चला अनावरण करण्यात आले होते. या पुतळ्याच्या मेघडंबरीचा एक तुकडा दुसऱ्याच दिवशी खाली पडला. या निषेधार्थ चित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुणे महानगर पालिकेतील महापाैर मुरलीधर माेहाेळ यांच्या कार्यालयात जावून महापाैर कार्यालयात हजर नसताना घाेषणाबाजी करत शाई फेक केल्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणी शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात सुरेश विष्णु कदम (वय – ३४, रा.सिंहगड राेड, पुणे) यांनी तक्रार दाखल केली असून चार अनाेळखी व्यक्तीं विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार सुरेश कदम व त्यांचे सहकारी शुभम हिंगमिरे हे सात मार्च राेजी महापाैर कार्यालयाजवळ गार्ड डयुटीला होते.  त्यावेळी चार अनाेळखी इसमांनी आपआपसात संगनमत करुन महापाैर कार्यालयात हजर नसताना, त्यांच्या कार्यालयात शिरुन ‘वंचित बहुजन आघाडीचा विजय असाे’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घाेषणाबाजी केली. तसेच महापाैरांची मानहानी करण्याचे उद्देशाने महापाैरांचे टेबलवर शाई टाकुन टेबल खराब व विद्रुप केला. त्याचप्रमाणे कार्यालयाच्या बाहेरील बाेर्डालाही शाई लावून ताे खराब केला. यावेळी  पळुन जाताना सहकारी शुभम हिंगमिरे याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी झटापटी करुन त्याचे शर्टला शाई पुसून सदर दाेघांना सरकारी कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करुन आराेपी पळून गेल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस पुढील तपास करत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading