देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला.
अजित पवार, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अनिल गोटे, एकनाथ खडसे, जयकुमार रावल, हेमंत नगराळे आदींबाबत विशेष सरकारी वकिलांच्या व्हिडीओमधील संवाद फडणवीसांनी वाचून दाखवला.
भाजप आमदार गिरीश महाजन यांच्याबाबत राज्य सरकारकडून कशाप्रकारे षडयंत्र रचलं गेलं याबाबत फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय. फडणवीस म्हणाले की, गिरीश महाजनांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला. 2021 मध्ये असा गुन्हा दाखल केला की 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका वादाबाबत भोईटे गटाच्या वतीनं महाजनांची स्वीय सहायक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या एकाचं अपहरण केलं. मग गिरीश महाजनांचा फोन आला त्यांनी धमकी दिली. त्या आधारावर त्याला सांगण्यात आलं की तू त्या विद्या प्रसारक मंडळाचा राजीनामा दे. त्यावर आम्हाला यायचं आहे. अशाप्रकारची अत्यंत बनावट केस तयार केली. त्या पलिकडे जाऊन गिरीश महाजनांचा मकोका लागला पाहिजे म्हणून तशी कागदपत्र गोळा केली गेली. पण महाजनांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
गिरीश महाजनांबाबत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी काय वक्तव्ये केली, कशाप्रकारे महाजनांना अडकवण्याचा डाव आखला जात होता? याबाबतचा संवाज फडणवीसांनी वाचून दाखवला. तो संवाद खालीलप्रमाणे….
तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का? ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो. आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. केवळ संशय क्रिएट करणे पुरेसे. शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण? सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी. रवि शिंदेने त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले. संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचे.
