पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला जल्लोषात सुरुवात
पुणे : आर्यन गाडगीळ आणि आरव विजच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर क्वालिटी वॉरियर्स संघाने पूना क्लबच्या वतीने आयोजित पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत वेन्डकिन ईगल्स संघावर ३९ धावांनी मात केली.
पूना क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पूना क्लबचे अध्यक्ष नितीन देसाई, उपाध्यक्ष सुनील हांडा, स्पर्धा समितीचे अध्यक्ष शशांक हळबे, अमेय कुलकर्णी, मुख्य प्रायोजक राकेश नवाणी, आशुतोष आगाशे, मनजीत राजपाल, तारीक पारवानी, उमेश पिल्लई,रणजित पांडे, अशोक गाडगीळ, अभिषेक बोके उपस्थित होते. स्पर्धेचे यंदा ८ वे वर्षे आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत क्लबमधील १२ ते ५५ वयोगटातील खेळाडू सहभागी झाले आहेत.
सोमवारी झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत वॉरियर्स संघाने ईगल्स संघाचा सहज पराभव केला. वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित सहा षटकांत १ बाद ९६ धावा केल्या. आर्यन गाडगीळने १६ चेंडूत चार चौकार व एका षटकारासह नाबाद ३६, तर कर्णधार आरव विजने १५ चेंडूत पाच चौकार व चार षटकारांसह ४८ धावा केल्या. आर्यन – आरव जोडीने ४.२ षटकांत ७६ धावांची सलामी दिली. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ईगल्स संघाला निर्धारित सहा षटकांत ५ बाद ५७ धावाच करता आल्या. यात अकिलाक पूनावालाने पहिल्याच चेंडूवर कर्णधार अरूण खट्टरला बाद केले. यानंतर सिद्धान्त धर्मा आणि विनीत परमारने धावगती वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही यश आले नाही. सिद्धान्तने १८ चेंडूंत २३ धावा केल्या. रोहन पाटील (५), विशाल सेठ (०), योहान मेहता (नाबाद ९) यांना फार फटकेबाजी करता आली नाही.
धावफलक : वॉरियर्स – ६ षटकांत १ बाद ९६ धावा (आर्यन गाडगीळ नाबाद ३६, आरव विज ४८, रोहन पाटील १-६) वि. वि. वेलकिन ईगल्स – ६ षटकांत ५ बाद ५७ (सिद्धान्त धर्मा २३, विनीत परमार १४, अकिलाक पूनावाला १-८, आरव विज १-१०, विक्रम दामले २-८, राहिल १-१७).
