Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

नारो आप्पाजी हे पेशवाईतले प्रसिद्ध व कर्तबगार व्यक्तिमत्व – मंदार लवाटे

पुणे :तुळशीबाग राममंदिर नारो आप्पाजी तुळशीबागवाले यांनी बांधले. नारो आप्पाजी हे पेशवाईतले प्रसिद्ध व कर्तबगार व्यक्तिमत्व. जमा, खर्च व महसूल या विषयांत त्यांनी मोठे काम केले. सन १७५० साली बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी नारो आप्पाजी यांना पुणे प्रांताचे सरसुभेदार केले. पेशव्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे व घरगुती संबंध होते, असे इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी सांगितले.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात श्रीमंत नारो आप्पाजी तुळशीबागवाले (खिरे) यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुस्तिका प्रकाशन, व्याख्याव व विशेष कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. मंदार लवाटे यांनी व्याख्यानातून व कीर्तनकार ह.भ.प.वासुदेवबुवा बुरसे यांनी कीर्तनातून नारो आप्पाजी यांचे कार्यकर्तृत्व सांगितले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.

मंदार लवाटे म्हणाले, निजामाने पुण्यावर जेव्हा हल्ला केला, तेव्हा मोठया हुशारीने नारो आप्पाजी यांनी पुणे वाचविले व या हल्ल्यात अस्ताव्यस्त झालेल्या पुण्याला पूर्वपदावर आणायचे काम देखील त्यांनी केले. नारायण पेशव्यांची हत्या, सास्टीची लढाई आदी संकट काळात त्यांनी मोठी कामगिरी पार पाडली. इ.स.१७६२ मध्ये नारो आप्पाजी यांनी राम मंदिराची स्थापना केली. पानिपतच्या भीषण युद्धानंतर लगेचच नारो आप्पाजी यांनी फेब्रुवारी-मार्च महिन्यात राम मंदिराच्या पायाचा मुहूर्त केला. त्यानंतर सन १७६५ मध्ये राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती घडविण्यात आल्या.

ह.भ.प. वासुदेवबुवा बुरसे म्हणाले, पेशवाईतील आर्थिक बाजू सावरणारे संकट मोचक म्हणून नारो आप्पाजी यांनी कार्य केले. सरदार खासगीवाल्यांकडे चाकरी करताना ज्या बागेत तुळशी वेल खुडले, तीच बाग विकत घेऊन भव्य श्रीराम मंदिर उभे करण्यासाठी नारो आप्पाजी अथक प्रयत्नशील राहिले. त्यामुळे पुण्याच्या विकासाच्या श्रेयनामावलीमध्ये श्रीमंत नारो आप्पाजी तुळशीबागवाले यांचे नाव अग्रभागी आहे, असेही त्यांनी सांगितले. श्रीरंग चासकर यांनी तबला साहिल पुंडलिक यांनी कीर्तनाला पेटीची साथसंगत केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading