लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२२ स्पर्धेचे ४ मार्चपासून आयोजन
पुणे : लायन्स् क्लब पुणे रहाटणी तर्फे लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ ते १३ मार्च २०२२ या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा सिल्व्हर क्रिकेट मैदान आणि हजारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स् येथील मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना लायन्स् क्लब पुणे रहाटणीचे अध्यक्ष महेश दिवटे व कन्व्हेनर विजय कोतवाल यांनी सांगितले की, साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या स्पर्धेत एकूण ८ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. ४० वर्षावरील खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत. ही स्पर्धा लायन सागर ढोमसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आली आहे.
दादाज् इलेव्हन, जाधव नाईट रायडर्स, बाश्री ब्लास्टर्स, शार्प आर्क इलेव्हन, दिक्षित रॉयल्स्, रॉयल पासलकर, लवास रॉयल्स्, डिएमटीसी अँड एनईयुसी इलेव्हन या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन गुरूवार, ४ फेब्रुवारी रोजी डिस्ट्रीक्ट गव्हनर्र कैलास घटानी, हेमंत नाईक आणि क्लबच्या सदस्यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना आणि स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, १३ मार्च रोजी होणार आहे.
विजेत्या संघाला करंडक तर, उपविजेत्या संघाला करंडक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गतवर्षी २०२१ स्पर्धेत दिक्षित रॉयल्स् संघाने विजेतेपद तर, दादाज् इलेव्हन संघाने उपविजेतेपद मिळवले होते.
