fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

औद्योगिकीकरणासह तरुणांनी शेतीकडे देखील वळावे -गिरीष बापट

पुणे : उद्योग करताना तरुणांनी  संयम ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही उद्योगात यश लगेच मिळणार नाही. त्यामुळे अपयशाने लगेत खचून जाऊ नये. औद्योगिकरणासोबत तरुणांनी शेतीकडे देखील वळायला हवे. कोणतेही काम करण्याची लाज वाटून घ्यायला नको. तरच आपला देश पुढे जाईल. आपला देश नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न आहे. हजारो एकर जमिनी पडून आहेत. भारताच्या मसाल्यांना तसेच आयुर्वेदाची मागणी लक्षात घेता आयुर्वेदीक शेती करायला पाहिजे. असे मत खासदार गिरीष बापट यांनी व्यक्त केले. 
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित आॅनलाईन महागणेशोत्सवातील घेऊ भरारी – चला उद्योजक बनूयात  या कार्यक्रमाचे  उद््घाटन  बापट यांनी आॅनलाईन केले. यावेळी ते बोलत होते. सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष रविंद्र बरीदे, शिरीष मोहिते, वैभव वाघ,निलेश रनसिंग, तन्मय तोडमल, विक्रांत मोहिते, अमेय थोपटे, कुणाल जाधव, गणेश सांगळे उपस्थित होते. प्रसाद भारदे यांनी मुलाखत घेतली.
गिरीष बापट म्हणाले, सेवा मित्र मंडळ केवळ गणेशोत्सवच तर वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम मंडळातर्फे राबविले जातात. समाज प्रबोधन मंडळाने जाणीवपूर्वक जपले आहे. घेऊ भरारी हा चांगला उपक्रम मंडळाने सुरु केला आहे. तरुणांना दिशादर्शक ठरणारा हा उपक्रम आहे, असेही त्यांनी सांगितले.
उत्सवाचे उद््घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. घेऊ भरारी या कार्यक्रमात आगामी दशक शेती व्यवसायाचे, शेतक-यांचे याविषयावर अभिनेते प्रविण तरडे, उद्योजक व्यक्तीमत्व घडविताना याविषयावर आमदार रोहित पवार, फळ-भाजीपाला प्रक्रिया-एक नवीन संधी याविषयावर संजय ओरपे, व्यवसाय आणि मार्केटिंग याविषयावर धनंजय दातार, ब्रँड डेव्हलपमेंट याविषयावर अ‍ॅडगुरु व दिग्दर्शक रवी जाधव आणि घेऊ भरारीमध्ये खासदार अमोल कोल्हे हे देखील संवाद साधणार आहेत. 
अध्यक्ष रविंद्र बरीदे म्हणाले, श्री गणेश पुराण, स्वराज्याचे शिलेदार प्रेरणापर्व, गणेशोत्सव माझा, घेऊ भरारी यांसारख्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी सेवा आॅनलाईन महागणेशोत्सव सजणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे शक्य नसले, तरी देखील आॅनलाईन स्वरुपात केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील गणेशभक्तांकरीता अनुभविता येतील. 
१ सप्टेंबर पर्यंत दररोज दुपारी ४ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे श्री गणेश पुराण याविषयावर कीर्तन सुरु आहे. गणेशोत्सव माझा या कार्यक्रमातून  १ सप्टेंबर पर्यंत गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांचे मनोगत हा संवादात्मक उपक्रम दररोज दुपारी १२.३० वाजता गणेशभक्तांना घरबसल्या अनुभविता येणार आहे. संवाद कार्यक्रमाचे उद््घाटन आमदार मुक्ता टिळक यांनी केले. स्वराज्याचे शिलेदार प्रेरणापर्व या कार्यक्रमातून युवा शिवशाहीर सौरभ कर्डे हे स्वराज्याच्या शिलेदारांची प्रेरणाकथा या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटन स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी केले. 
https://www.facebook.com/SevaMitraMandal या फेसबुक पेजवरुन ´तसेच मंडळाच्या युट्युब पेजवरून हे कार्यक्रम विनामूल्य गणेशभक्तांना पाहता येणार आहेत. तरी नागरिकांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading