१५ वा वित्त आयोग – ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीतून मिळणार घरगुती नळजोडणी – गुलाबराव पाटील
जळगाव ) दि. 6 :- केंद्र शासनाने 15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या निधीमधील बंधीत स्वरूपातील निधी हा सद्यस्थितीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी प्राधान्याने वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने हा निधी ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यक्रमांसाठी वापरण्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्यामुळे या निधीतून गावांमधील सर्व घरांना घरगुती नळजोडणी मिळणार असल्याची माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, 15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणारा निधी ५०% बंधीत स्वरुपात ठेवला असून त्याचा वापर मुख्यत: पिण्याच्या पाण्याच्या व स्वच्छतेच्या योजनांसाठी करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार हा निधी पुढील आदेशापर्यंत संबंधित ग्रामपंचायतीने १००% कार्यात्मक घरगुती नळजोडणी देण्यासाठीच वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील गावांमध्ये घरगुती नळ जोडणीची कामे पूर्ण होणार असून यामुळे नागरिकांना घरापर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
