fbpx
Friday, April 26, 2024
MAHARASHTRA

‘दैनिक पुण्यनगरी’चे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे निधन

पुणे, दि. 6 – ‘दैनिक पुण्यनगरी’चे संस्थापक- संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे निधन झाले. जुन्नर तालुक्यातील जन्मगाव असलेल्या गायमुख वाडीत आज दुपारी एक वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज या गावी 7 मार्च 1938 रोजी झाला होता. इयत्ता चौथीपर्यंत शिकलेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. सुरुवातीला फळ विक्री, त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरु केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुंबईतल्या फाउंटन परिसरात आंदोलन झाले, त्याचे बाबा साक्षीदार होते. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते.

‘मुंबई चौफेर’ नावाचे सायं दैनिक बाबा शिंगोटे यांनी 1994 मध्ये सुरु केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभूमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ 1999 मध्ये रोवली.

मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जन्मगावी सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करुन अंत्यसंस्कार होणार आहेत.

राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी बाबा शिंगोटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading