राज्यातील १ कोटी ८० लाख मतदार अद्याप एसआयआर प्रक्रियेबाहेर
मुंबई : महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला वेग आला असला, तरी राज्यातील तब्बल १ कोटी ८० लाख ६० हजार ६९७ मतदार अद्याप या प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत. या मतदारांना गणना प्रपत्र जमा करण्यासाठी १७ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव एस. चोकलिंगम् यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जूनपर्यंत राज्यात ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी ७ कोटी ६० लाख ९८ हजार १५३ मतदारांचे स्वाक्षरीयुक्त गणना प्रपत्र जमा करून त्याचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
उर्वरित मतदारांमध्ये प्रामुख्याने अनुपस्थित, स्थलांतरित, मृत तसेच दुबार नोंदणी असलेल्या मतदारांचा समावेश आहे. शहरी भागात SIR प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. ठाणे, नागपूर, मुंबई, पुणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत प्रक्रियेबाहेर असलेल्या मतदारांची संख्या तुलनेने अधिक आहे.
१७ ऑगस्टनंतर २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर दावे व हरकती नोंदविण्यासाठी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान मुदत असेल. प्राप्त दावे-हरकतींचा निपटारा २२ ऑक्टोबरपर्यंत केला जाईल. त्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
मतदारांनी अंतिम मुदतीपूर्वी आपले गणना प्रपत्र जमा करून मतदार यादीतील नोंदणी आणि तपशील अचूक असल्याची खात्री करावी, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.
