Thursday, August 13, 2026
Latest NewsPUNE

जागतिक जैवइंधन दिनाचे औचित्य साधत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमीचे उद्घाटन

पुणे : जागतिक जैवइंधन दिनानिमित्त (१० ऑगस्ट) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जैव-अर्थव्यवस्थेच्या उदयोन्मुख क्षेत्रात आंतरशाखीय संशोधन, शिक्षण तसेच उद्योग-सहकार्याला चालना देणारे हे केंद्र एक महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक उपक्रम ठरणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागात हे केंद्र स्थापन करण्यात आले असून, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष, प्रख्यात उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांच्या सहकार्याने या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. डॉ. प्रमोद चौधरी यांनी वैयक्तिक स्तरावर या केंद्राच्या स्थापनेसाठी ७५ लाख रुपयांची देणगी दिली आहे.

या उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग कळकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, तंत्रज्ञान विभागातील डॉ. सोमनाथ नंदी, डॉ. वंदना धिंग्रा तसेच प्राज इंडस्ट्रीजचे घनश्याम देशपांडे, अतुल मुळे, डॉ. प्रमोद कुंभार, दत्तात्रय निंबोळकर आणि आनंद घोसाळकर उपस्थित होते.

या केंद्राविषयी सादरीकरण करताना डॉ. सोमनाथ नंदी यांनी सांगितले की, या केंद्राच्या माध्यमातून चालू शैक्षणिक वर्षापासूनच एम.टेक.च्या विद्यार्थ्यांसाठी दोन नवीन अभ्यासक्रम ओपन इलेक्टिव्ह म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये ‘शाश्वत विकासासाठी जैव-अर्थव्यवस्था’ आणि ‘जैवइंधन व जैवऊर्जा’ या दोन अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांना विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने नवीन ऐच्छिक अभ्यासक्रम म्हणून मान्यता दिली आहे.

या केंद्राचा मुख्य भर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हरित अर्थव्यवस्था, सिंथेटिक बायोलॉजी तसेच सांख्यिकीय मॉडेलिंग आणि ऑप्टिमायझेशन या क्षेत्रांवर राहणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमीच्या संचालकपदासाठी डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. डॉ. देशपांडे यांनी मेरी-क्युरी फेलोशिपअंतर्गत लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये पोस्ट-डॉक्टोरल संशोधन केले असून, एनसीएल – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. प्राप्त केली आहे. शाश्वत उत्प्रेरकांच्या अर्थात सस्टेनेबल कॅटॅलिस्ट्स क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी ते परिचित आहेत.

डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “शाश्वत भविष्यातील वाटचालीसाठी केवळ तांत्रिक नवोन्मेष पुरेसा नाही. त्यासाठी कुशल मनुष्यबळ, सक्षम संस्था आणि अर्थपूर्ण सहकार्य आवश्यक आहे. भविष्यातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी शिक्षणक्षेत्र, उद्योग आणि संशोधन यांना एका व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने या सेंटर ऑफ एक्सलन्सची संकल्पना साकारण्यात आली आहे. त्याचबरोबर जैव-अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या प्रतिभावान मनुष्यबळाची जडणघडण करण्याचे कामही या केंद्रामार्फत केले जाईल.”

डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, “समाजावर सकारात्मक परिणाम घडवून आणणाऱ्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीत विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेमुळे आंतरशाखीय संशोधन, आणि उद्योग-सहकार्याप्रती आमची बांधिलकी अधिक दृढ झाली आहे. भविष्यासाठी शाश्वत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी विद्यार्थी, संशोधक आणि नवोन्मेषकांना हे केंद्र सक्षम करेल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading