Thursday, August 13, 2026
Latest NewsPUNE

सरफोजीराजे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.शरद गोरे

 

तंजावरच्या भूमीत रंगणार ऐतिहासिक सोहळा

पुणे: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने येत्या २३ सप्टेंबर रोजी तंजावर (तामिळनाडू) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘द्वितीय सरफोजीराजे मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. शरद गोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तंजावर संस्थानचे युवराज श्रीमंत संभाजीराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्राचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे या ऐतिहासिक संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.
तंजावरचे छत्रपती सरफोजीराजे भोसले हे २८ भाषांमध्ये पारंगत असणारे अष्टपैलू राजे होते. त्यांनी मराठी, संस्कृत, तमिळ, मोडीसह विविध भाषांमध्ये ३५ महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखन केले. जगातील सर्वात समृद्ध मानल्या जाणाऱ्या ‘सरस्वती महाल’ ग्रंथालयाची निर्मिती हे त्यांचे अजरामर योगदान आहे. त्यांच्या याच उत्तुंग साहित्यिक, कला, संगीत, आरोग्य आणि शैक्षणिक कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण भारतात होणारे हे पहिलेच वैशिष्ट्यपूर्ण मराठी साहित्य संमेलन ठरणार आहे.
या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांचे मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनात अतुलनीय योगदान राहिलेले आहे. त्यांनी १० ग्रंथांचे विपुल लेखन केले असून छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथाचा मराठी काव्यानुवाद साकारला आहे. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आजवर १९७ साहित्य संमेलने पार पडली असून, या कार्याची नोंद ‘अमेरिकन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे. याशिवाय ६ मराठी चित्रपटासाठी अभिनयासह गीतलेखन संगीत दिले आहे व लेखन दिग्दर्शन केले आहे,त्यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या या मराठी चित्रपटास कान्स व बर्लिन या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पारितोषिक मिळाले आहे,
१५५ पुस्तकांचे ‘युगंधर प्रकाशन’द्वारे प्रकाशन आणि २ हजारांहून अधिक व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी मोठी प्रबोधन चळवळ उभारली आहे. डॉ. गोरे यांच्या या निवडीबद्दल साहित्यिक व सांस्कृतिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading