संजय राऊतांना होती मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा; नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजकीय भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजय राऊत यांना मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि त्यासाठी त्यांनी पक्षातील घडामोडींमध्ये हस्तक्षेप केला, असा दावा म्हस्के यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हस्के यांनी सांगितले की, पवईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचे नाव पुढे केले होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होऊ नये, यासाठीही राऊत यांनी काही नेत्यांशी चर्चा केली होती, असा आरोप त्यांनी केला.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राऊत आपल्याला दररोज फोन करून विविध गोष्टी सांगत होते, असा दावाही म्हस्के यांनी केला. या फोनवरील संभाषणांचे रेकॉर्डिंग सार्वजनिक करण्याचे आव्हान त्यांनी राऊत यांना दिले. तसेच, आपण एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लिहिलेले एकही पत्र दाखवले, तर आपण खासदारकीचा राजीनामा देऊ, असे म्हस्के यांनी म्हटले. असे पत्र दाखवता आले नाही, तर संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
राऊत यांना राज्यसभेचे तिकीट मिळत नसताना त्यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याचा आरोपही म्हस्के यांनी केला. या प्रकाराची माहिती शिवसैनिकांना असल्याचे ते म्हणाले.
“संजय राऊत यांचे प्रेम बेगडी आहे. काँग्रेससोबत जाण्यासाठी त्यांनी पक्षाला भाग पाडले. पक्षाची सूत्रे स्वतःच्या हातात घेण्याची त्यांची इच्छा होती,” असा आरोप म्हस्के यांनी केला.
राऊत यांनी आतापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले, मात्र त्यापैकी किती खरे ठरले, असा सवाल करत म्हस्के यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीकाही केली. आपण राऊत यांना ‘भोंगा’ म्हणण्यास सुरुवात केल्यामुळेच त्यांचा आपल्यावर राग असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, म्हस्के यांच्या या आरोपांमुळे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील राजकीय संघर्ष पुन्हा चिघळण्याची शक्यता असून, राऊत या आरोपांना काय प्रत्युत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
