पुण्यातील ३० हजार शालेय मुलींना मिळणार अस्मिता डिग्निटी किट
पुणे : ‘डॉटर्स डे’चे औचित्य साधत रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी, पुणे व जीटीपीएल हॅथवे यांच्यातर्फे पुण्यातील २०० शाळांमधील ३० हजार किशोरवयीन शालेय मुलींना ‘अस्मिता डिग्निटी किट’ वितरित करण्याचा उपक्रम जाहीर करण्यात आला. नुकताच नगर रस्त्यावरील हयात पुणे येथे अस्मिता सिम्पोजियम २०२६ कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी या उपक्रमाची घोषणा करण्यात आली.
मुलींचे मासिक पाळीतील आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता आणि पोषण यांसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे हा या किटचा उद्देश आहे. प्रत्येक ‘अस्मिता डिग्निटी किट’मध्ये ३ सॅनिटरी पॅड्स, ३ सॅनिटायझर पाऊच, ३ टॅब्लेट टॉवेल्स, ३ स्पॉट आणि २ पॅच बँडेज, एक शिट्टी, पीनट बार, ओआरएसचे एक पाकीट, ५ सेफ्टी पिन्स, आवश्यक माहितीचा कस्टमाइज्ड चार्ट आणि अस्मिता पाऊच आदी वस्तूंचा समावेश असल्याची माहिती यांचा समावेश रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडीच्या रीना शेठ यांनी दिली.
कार्यक्रमात बोलताना शेठ म्हणाल्या की, प्रत्येक मुलीला सन्मान, आत्मविश्वास आणि मूलभूत गरजा सहज उपलब्ध असलेल्या वातावरणात वाढण्याचा अधिकार आहे. मुलींच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या डिग्निटी किटच्या माध्यमातून त्यांना आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे.
मासिक पाळीच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘अस्मिता’ उपक्रमाचा गेल्या काही वर्षांत विस्तार झाला असून, मुलींचा सन्मान, सुरक्षितता, कौशल्यविकास आणि विविध संधी यांवरही या उपक्रमात भर देण्यात आला आहे. रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी, पुणे तर्फे सुरु करण्यात आलेल्या अस्मिता उपक्रमांतर्गत गेल्या ७ वर्षात ५ राज्यांमध्ये ३०० हून अधिक ठिकाणी २०० हून अधिक रोटरी क्लबच्या माध्यमातून सुमारे २ लाख २० हजार किशोरवयीन मुलींपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात मदत पोहोचवण्यात आली आहे.
