जिओफायनान्सकडून ‘जिओसिल्व्हर’ सुविधा सुरू; १० रुपयापासून डिजिटल चांदीत गुंतवणूक
मुंबई : जिओफायनान्स अॅपचे व्यवस्थापन करणाऱ्या जिओ फायनान्स प्लॅटफॉर्म अँड सर्व्हिस लिमिटेड (जेएफपीएसएल) या वित्तीय सेवांसाठीच्या विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या व्यासपीठाने अॅपवर ‘जिओसिल्व्हर’ नावाची नवीन सुविधा सुरू केली आहे. यामध्ये कर्ज, विमा, गुंतवणूक आणि पेमेंट्ससह विविध वित्तीय सेवा उपलब्ध आहेत. जिओसिल्व्हरद्वारे ९९.९ टक्के शुद्ध, भौतिक चांदीवर आधारित डिजिटल चांदीमध्ये गुंतवणूक करता येणार असून, गुंतवणुकीची सुरुवात केवळ १० रुपयापासून करता येईल.
जिओसिल्व्हरच्या माध्यमातून वापरकर्ते :
- १० ते १ लाख रुपयापर्यंतच्या प्रत्येक व्यवहारात डिजिटल चांदी खरेदी करू शकतात.
- बाजाराशी जोडलेल्या प्रत्यक्ष वेळेतील दरांवर व्यवहार करू शकतात आणि विक्रीतून मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळवू शकतात.
- नियमित सिल्व्हर एसआयपी सुरू करू शकतात. यामध्ये साप्ताहिक किंवा मासिक एसआयपीची निवड करण्याची सुविधा आहे.
- थेट भौतिक चांदीची नाणी खरेदी करू शकतात किंवा जमा केलेल्या होल्डिंग्सचे प्रमाणित चांदीच्या नाण्यांमध्ये रूपांतर करू शकतात.
- जिओफायनान्स अॅपवरील स्वतंत्र जिओसिल्व्हर डॅशबोर्डच्या माध्यमातून चांदीचे प्रत्यक्ष वेळेतील दर, होल्डिंग्स आणि व्यवहार पाहू शकतात.
सर्व भौतिक चांदीची शुद्धता नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (नॅबल) मान्यताप्राप्त सुविधांमध्ये तपासली जाते. पात्र ठरणाऱ्या प्रत्येक खरेदीवर जिओपॉइंट्सही मिळतात. हे जिओपॉइंट्स वापरकर्ते अॅपमध्ये ब्रँड व्हाउचर्स, शॉपिंग सवलती आणि भागीदारांच्या ऑफर्ससाठी रिडीम करू शकतात.
जेएफपीएसएल ही जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
या सुविधेच्या प्रारंभाबाबत बोलताना, जिओ फायनान्स प्लॅटफॉर्म अँड सर्व्हिस लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरभी एस. शर्मा म्हणाल्या, “विविध प्रकारच्या गुंतवणुकीची रणनीती तयार करण्यात मौल्यवान धातू आणि कमोडिटीज महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे गुंतवणूकदारांना अधिक सक्षम पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत होते. पारंपरिक पद्धतीने चांदी भौतिक स्वरूपात ठेवली जात असली, तरी जिओसिल्व्हरमुळे ती पारदर्शक, सुरक्षित आणि त्रासमुक्त डिजिटल मालमत्तेत रूपांतरित होते. साठवणुकीची चिंता न करता तिची मालकी घेणे आणि विक्री करणे सहज शक्य होते. या सुविधेच्या प्रारंभामुळे जिओफायनान्स अॅपच्या वापरकर्त्यांना गुंतवणूक करण्यासाठी आणि भविष्यासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी आणखी एक सुलभ आणि सोयीचे साधन उपलब्ध होत आहे.”
जिओसिल्व्हरचा प्रारंभ जिओफायनान्सच्या विद्यमान डिजिटल गोल्ड सुविधेला पूरक असून, अॅपच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये आणखी विस्तार झाला आहे.
