Saturday, October 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

प्रशांत किशोर यांच्या देवगिरी भेटीने राष्ट्रवादीत नव्या समीकरणांची चर्चा; सुनेत्रा-पार्थ पवारांसोबत बंद दाराआड बैठक

मुंबई  : देशातील नामांकित राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. बंद दाराआड झालेल्या या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आगामी निवडणुकांसाठी नवी रणनीती आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या बैठकीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी ती पक्षाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, राज्यभर जनमत चाचणी घेण्याचा आराखडा, पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि जनमानसातील प्रतिमा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. पक्षाच्या अलीकडील वर्धापनदिन कार्यक्रमाच्या नियोजनातही प्रशांत किशोर यांचे मार्गदर्शन लाभल्याची चर्चा आहे.

याआधी मे महिन्यातही प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी पार्थ पवार यांनी भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, प्रशांत किशोर यांची पक्षाचे अधिकृत राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याच्या चर्चांचे त्यांनी खंडन केले होते. तरीही पुन्हा झालेल्या या भेटीमुळे त्या चर्चांना नव्याने बळ मिळाले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय रणनीतीत प्रशांत किशोर यांची भूमिका नेमकी काय असणार, याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, सलग होत असलेल्या बैठका आणि आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता या घडामोडींना राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading