15 ऑगस्टपूर्वी व्यवहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण करा; एक लाखांहून अधिक चालकांनी घेतला लाभ : प्रताप सरनाईक
मुंबई : राज्यातील अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. आतापर्यंत राज्यातील एक लाखांहून अधिक चालकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनीही या उपक्रमात सहभागी होऊन प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्रात रोजगार करताना मराठी भाषा शिकणे ही केवळ औपचारिकता नसून सामाजिक बांधिलकी आहे. मराठी ही कोणावर लादली जाणारी भाषा नसून संवाद, आपुलकी आणि परस्पर विश्वास वाढवणारी भाषा आहे. चालकांनी मराठीतून संवाद साधल्यास प्रवाशांशी अधिक आत्मीय नाते निर्माण होईल आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल आदर व्यक्त होईल, असे त्यांनी नमूद केले.
मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत या मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण तसेच विविध साहित्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ते लोकचळवळीचे स्वरूप धारण करत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
मराठी ही महाराष्ट्राच्या अस्मिता, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक असल्याचे सांगत सरनाईक यांनी राज्यात राहून उपजीविका करणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा सन्मान करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या प्रचार-प्रसारासाठी अशा उपक्रमांना अधिक महत्त्व प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.
१ मेपासून सुरू झालेल्या या अभियानाचा समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो चालकांना व्यवहारिक मराठीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
दरम्यान, १५ ऑगस्टनंतर प्रशिक्षण पूर्ण न करणाऱ्या चालकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई किंवा प्रशासकीय निर्णय होणार का, याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या सरकारचा भर जास्तीत जास्त चालकांनी स्वेच्छेने मराठी शिकावी आणि प्रवाशांशी मराठीतून संवाद वाढवावा, यावर असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
