स्थलांतरित कामगारांचा सन्मान हाच खऱ्या विकासाचा पाया : ज्योती सावर्डेकर
पुणे : देशाच्या विकासामागे स्थलांतरित कामगारांचे मोलाचे योगदान असतानाही त्यांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत व्यक्त करत, विकासाचा पुढील टप्पा हा स्थानिक रोजगारनिर्मिती आणि कामगारांच्या सन्मानावर आधारित असला पाहिजे, असे मत भारतीय जनता मजदूर सेल (बीजेएमसी) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ज्योती सावर्डेकर यांनी व्यक्त केले.
सावर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उंच इमारती, महामार्ग, मेट्रो आणि उद्योग पाहून देशाच्या विकासाचा अभिमान वाटतो. मात्र या विकासामागे अहोरात्र कष्ट करणाऱ्या कामगारांच्या त्यागाची दखल घेतली जात नाही. बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्रसह देशातील विविध राज्यांमधून लाखो युवक रोजगाराच्या शोधात घरापासून शेकडो किलोमीटर दूर जातात. ते केवळ रोजगारासाठी स्थलांतर करत नाहीत, तर संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात.
त्यांनी नमूद केले की, रोजगारासाठी घरापासून दूर राहणाऱ्या कामगारांमुळे अनेक कुटुंबे विभक्त होतात. वडील मुलांच्या बालपणापासून दूर राहतात, मातांवर घर आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकहाती येते, तर वृद्ध पालक मुलांच्या सहवासापासून वंचित राहतात. त्यामुळे स्थलांतर हा केवळ आर्थिक विषय नसून तो सामाजिक, भावनिक आणि सांस्कृतिक विस्थापनाचाही प्रश्न आहे.
देशाच्या विकासाचे मोजमाप जीडीपी, गुंतवणूक, निर्यात आणि उत्पादनाच्या आकडेवारीवर होत असले तरी तुटलेली कुटुंबे, हरवलेले बालपण आणि वाढता मानसिक ताण याची किंमत कोण मोजणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सावर्डेकर यांनी प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात उद्योग उभारून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना देण्याची गरज व्यक्त केली. गावागावांत कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध झाल्यास लाखो कुटुंबांचे विभक्त होणे टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.
कामगारांना केवळ रोजगार नव्हे तर सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यासाठी योग्य वेतनासह सुरक्षित निवास, दर्जेदार आरोग्यसेवा, मुलांचे शिक्षण, सामाजिक सुरक्षा, कौशल्य विकास आणि मानसिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणारे सर्वसमावेशक कामगार धोरण राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
“विकसित भारताची खरी ओळख उंच इमारतींनी नव्हे, तर देश घडविणाऱ्या श्रमिकांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आत्मसन्मानाने होईल,” असेही सावर्डेकर यांनी अधोरेखित केले.
