Friday, September 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भुजबळांच्या टीकेला जरांगेंचे प्रत्युत्तर; “ओबीसींच्या नावावर सगळं खाल्लं”

जालना : मराठा आरक्षणाच्या मागण्यांवरून राज्यात राजकीय वातावरण तापले असताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा उपसमितीच्या निर्णयाबाबत व्यक्त केलेल्या नाराजीवर मनोज जरांगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भुजबळ यांनी मराठा समाजाच्या मागण्यांना विरोध करण्याऐवजी स्वतःच्या राजकारणाकडे लक्ष द्यावे, अशी टीका जरांगे यांनी केली.
“या वयात त्यांनी स्वतःचे राजकारण पाहावे. पुतण्याला खासदार कसे करता येईल, याचा विचार करावा. ओबीसींच्या नावावर त्यांनी सगळे खाल्ले,” अशा शब्दांत जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधला.
अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. राज्यातील ज्या मराठा समाजाच्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्यासह विविध मागण्या त्यांनी सरकारसमोर मांडल्या आहेत. सरकारच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मागण्या मान्य केल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

याच पार्श्वभूमीवर भुजबळांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जरांगे यांनी त्यांच्या राजकीय भूमिकांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “वेळ पाहून कधी महाविकास आघाडीत, कधी महायुतीत आणि कधी अजितदादांसोबत जाणारे हेच आहेत. ओबीसी महामंडळ आणि महाराष्ट्र सदनही त्यांनी सोडले नाही,” असा आरोप त्यांनी केला.
भुजबळांविरोधात ओबीसी समाजातही नाराजी असल्याचा दावा जरांगे यांनी केला. भुजबळांची राजकीय उतरती कळा सुरू झाली असून कोणत्याही समाजाविषयी द्वेषाची भावना ठेवणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.
मराठा समाजाला केवळ १० टक्के आरक्षण मिळाले आहे, असे सांगत जरांगे यांनी ओबीसींची संख्या ६० टक्के असल्याच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित केला. “ओबीसींची संख्या ६० टक्के आहे, असे भुजबळांना कोणी सांगितले? गेल्या दोन दिवसांत त्यांना काय झाले?” असा सवाल त्यांनी केला.
“वय वाढले आहे, त्यामुळे आता ते चांगली भूमिका घेतील असे वाटले होते. मात्र बळ गेले तरी पीळ गेलेला नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा पुतण्याला खासदार करण्यासाठी हा मुद्दा वापरला जात असेल, तर त्यांना आपण अधिक महत्त्व देण्याची गरज नाही,” असेही जरांगे यांनी म्हटले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading