Saturday, September 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘… तर मग मी प्रतिक्रिया का व्यक्त करावी?’

 

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुंबई प्रतिनिधी

दिशा सालीयान मृत्यू प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसताना संबंधित प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे केल्याबद्दल मी प्रतिक्रिया का व्यक्त करावी, असा सवाल माजी मंत्री व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना केला.

दिवंगत अभिनेेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक राहिलेल्या दिशा सालीयान मृत्यूप्रकरणी वारंवार आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त करून आरोपही करण्यात आले. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत विचारणा केली असता, याप्रकरणी आपण बोलण्याचे काहीच कारण नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सूचित केले.

दिशा सालीयान मृत्यू प्रकरणी विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून आपल्यावर आरोप केले जात आहेत, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता ठाकरे म्हणाले की, विरोधात असलेल्या प्रत्येकाला बदनाम करणे ही भाजपची पद्धतच आहे. त्यांनी अनेक वर्ष लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना ‘पप्पू’ म्हणून हिणवले आहे. त्यांच्याकडून आपल्यावरही तब्बल सहा वर्षापासून बदनामीची मोहीम राबवली जात आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून झाला होता. मुंबई पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण अपघाती मृत्यू तथा आत्महत्या म्हणून नोंदवून तपासले होते. मात्र एफआयआर नोंदवला नव्हता. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी 2025 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नव्याने तपास आणि सीबीआय चौकशीची मागणी केली होती. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास करण्याचा निर्णय दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading