Sunday, September 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

जालन्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम; ६२ महसूल मंडळांत शिबिरांचे आयोजन

 

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू असतानाच जालना जिल्हा प्रशासनाने कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील ६२ महसूल मंडळांमध्ये १६ सप्टेंबरपर्यंत विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत.

या शिबिरांच्या माध्यमातून जुन्या महसुली नोंदींचा शोध घेण्याबरोबरच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांना मदत केली जाणार आहे. प्रमाणपत्रासाठी कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, हा या मोहिमेचा उद्देश आहे.

प्रमाणपत्र प्रक्रियेशी संबंधित तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेणे, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी समन्वय साधणे आणि तक्रारींचा तातडीने निपटारा करणे, अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नागरिकांसाठी ९५४५४५१००५ हा संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सारथीच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतील आर्थिक मदतीची मर्यादा हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संस्थांचे शुल्क संबंधित यंत्रणेमार्फत थेट संस्थेला देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी मुंबई पोलिसांकडे आंदोलनाच्या परवानगीसाठी नव्याने पत्र दिले आहे. यापूर्वी आझाद मैदान पोलिसांकडे याबाबत अर्ज करण्यात आला होता. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन मुंबईत नेण्याचा इशारा पत्रातून देण्यात आला असून, आंदोलनाची तारीख नंतर जाहीर केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading