कुस्तीपटू अश्विनी पौळ आत्महत्या प्रकरणात पतीसह सासऱ्याला अटक
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याच्या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत पती आणि सासऱ्याला अटक केली आहे. मनोहर अंकुश पौळ आणि अंकुश पंढरीनाथ पौळ अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणात अश्विनी यांच्या पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चौघांविरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनी यांचे वडील तानाजी मोहिते यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सासरच्या मंडळींकडून मुलीचा छळ होत असल्याचा आरोप केला आहे. या त्रासाला कंटाळूनच अश्विनी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करत दोघांना अटक केली.
नळदुर्ग किल्ल्यावरील उपळी बुरुजावरून अश्विनी यांनी आपल्या तीन लहान मुलांसह सुमारे १०० फूट खोल दरीत उडी घेतली होती. या दुर्घटनेत अश्विनी आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी असून तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अश्विनी पौळ या राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट महिला कुस्तीपटू होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत पाच सुवर्ण आणि सहा रौप्य पदके मिळवली होती. उमरगा तालुक्यातील व्हंताळ हे त्यांचे माहेर असून, लहानपणापासूनच त्यांनी बहिणी तेजस्विनीसोबत कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. मुलींची कुस्तीतील आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना या खेळासाठी प्रोत्साहन दिले.
लग्नानंतर अश्विनी यांच्या वैवाहिक जीवनात मतभेद निर्माण झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या मानसिक तणावात होत्या. पतीच्या आग्रहामुळे त्यांनी मुंबईतील महाराष्ट्र सुरक्षा दलाची नोकरी सोडल्याचाही आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्या मुलांसह माहेरी राहत होत्या.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पती आणि सासऱ्याला अटक केल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. सासरच्या मंडळींकडून झालेल्या कथित छळाच्या आरोपांची तसेच अश्विनी यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
