Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

एमआयएमएच तर्फे आत्महत्येची संकटलक्षणे ओळखण्यासाठी नियंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेचे् आयोजन

पुणे :  महाराष्ट्र मानसिक आरोग्य (शासकीय संस्था) संस्थेतर्फे 11 सप्टेंबरला ‘ एकदिवसीय आत्महत्या प्रतिबंधक नियंत्रक प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती या संस्थेचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रफुल्ल कापसे यांनी दिली.
या कार्यशाळेत विद्यार्थी, शिक्षकांसह सामाजिक कार्यकर्त्यांना सहभागी होता येणार आहे. ही कार्यशाळा पाषाण येथे महाराष्ट्र मानसिक आरोग्य (शासकीय संस्था) येथे होणार आहे. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासह आत्महत्येच्या धोक्याची लक्षणे वेळीच ओळखून संबंधित व्यक्तीला योग्य मदतीशी जोडण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रशिक्षणातून दिली जाणार आहेत. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आणि संकटाच्या काळात व्यक्तीला आवश्यक आधार मिळवून देणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. प्रशिक्षणा दरम्यान मानसिक आरोग्याविषयीची समज वाढविण्यासोबतच आत्महत्येच्या प्रवृत्तीशी संबंधित मूलभूत बाबी समजावून सांगण्यात येणार आहेत.

स्वयंसेवकांपासून आरोग्य व्यावसायिकांपर्यंत सहभाग

या प्रशिक्षणासाठी स्वयंसेवक, विद्यार्थी, संशोधक, शिक्षक व प्राध्यापक, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, मानसशास्त्रज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह गरजू व्यक्तींना मदत व आधार देण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सहभागी होता येणार आहे.
प्रशिक्षणात आत्महत्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच मानसिक आरोग्याच्या समस्या वेळीच ओळखणे, योग्य वेळी हस्तक्षेप करणे आणि संकटग्रस्त व्यक्तीला आवश्यक मदत मिळवून देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, व्यावसायिक आणि विविध संस्थांशी संपर्क व संवाद साधण्याची संधी सहभागी व्यक्तींना मिळणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणार्‍या सहभागींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सहभागी होऊ इच्छिणार्‍यांना नोंदणी आवश्यक आहे. या उपक्रमात समाजातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे (शासकीय) डॉ.कापसे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading