डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी रविवारी पुणेकरांचा महापालिकेवर मोर्चा
पुणे : डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वाढत्या गोंगाटावरून पुण्यातील वातावरण तापले असतानाच, डीजेमुक्त गणेशोत्सवाच्या मागणीसाठी रविवारी नागरिकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे या आंदोलनाची घोषणा केली.
रविवारी सकाळी ११ वाजता बालगंधर्व चौकातील झाशीची राणी यांच्या पुतळ्याजवळ नागरिकांनी एकत्र यावे आणि तेथून पुणे महापालिकेच्या दिशेने मोर्चा काढावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात पुणेकरांनी एकत्रितपणे आवाज उठवावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लाऊडस्पीकरच्या वाढत्या आवाजाविरोधात भूमिका मांडणारे पुणेकर विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचाही डॉ. सावंत यांनी तीव्र निषेध केला. बापट हे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, बापट यांच्या भूमिकेला कृतीतून पाठिंबा देण्याचा निर्णय काही नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या मोर्चाकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
