Sunday, September 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

दहीहंडी उत्सवात डीजेचा सेटअप महिलेच्या अंगावर कोसळला; महिलेचा मृत्यू

पुणे  : पुण्यासह राज्यभरात डीजेच्या वापरावरून चर्चा आणि वाद सुरू असतानाच दहीहंडी उत्सवाच्या दिवशी पिंपरी-चिंचवडमधील जुनी सांगवी परिसरात दुर्दैवी घटना घडली. दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला डीजेचा अवजड सेटअप अचानक कोसळून एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जुनी सांगवी परिसरात स्थानिक पातळीवर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डीजेचा मोठा सेटअप असलेले वाहन उभे करण्यात आले होते. कार्यक्रम सुरू असताना अचानक या सेटअपचा तोल गेला आणि अवजड साहित्य रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेच्या अंगावर कोसळले. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली.

घटना घडताच उपस्थित नागरिक आणि आयोजकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत महिलेला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दहीहंडी कार्यक्रमासाठी आयोजकांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच वाहतूक पोलिसांकडून आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
डीजेचा सेटअप उभारणे, त्याची सुरक्षितता आणि कार्यक्रमाच्या आयोजनात कोणाचा निष्काळजीपणा झाला का, याचाही तपास केला जात आहे. तपासात हलगर्जीपणा किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास डीजे चालक तसेच संबंधित आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
सणाच्या उत्साहात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने जुनी सांगवी परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading