बाल तुळजाईच्या अवखळ लीलांनी रंगला गोकुळाष्टमीचा उत्सव !
सध्या महाराष्ट्रातल्या घराघरात दररोज रात्री आई तुळजाभवानी ही मालिका आवर्जून पाहिली जाते आहे, कारण तुळजाईच्या बाल अवतरातील लीलांनी मालिकेत एक अवखळ गंमत निर्माण झाली आहे. विष्णुदेवांच्या अश्रुमधून निर्माण झालेल्या बाल हरी सोंबत तुळजाईची जमलेली धमाल अवखळ जोडी आणि या अजब भावाबहिणीच्या जोडीच्या खोड्यांची धमाल मस्ती सध्या मालिकेत सुरू आहे, या बालपणातील खोड्या आता आणखी रंजक होणार असून दैवी चमत्कार आणि गोकुळाष्टमीच्या उल्हासामध्ये रंगलेला हा अनोखा आणि रंजक प्रवास मालिकेत लवकरच अनुभवायला मिळणार आहे.
सध्याच्या रंजक कथानकात हरीच्या एका अनाकलनीय हट्टाने संपूर्ण महालात एकच तारांबळ उडते. पोटाची नाही तर खास जिभेची भूक भागवण्यासाठी हरीला लोणी हवे असते, ज्यासाठी ही बालटोळी गंगाईचा विरोध पत्करून थेट दाम्याच्या घरी धडक मारते. तिथे अटीतटीने दहीहंडी फोडत हरीचे कृष्णरूप साकारले जाते आणि ती अद्भुत छबी पाहून तुळजाई अचंबित होते. एका बाजूला हा गोकुळाष्टमीचा आनंद सुरू असतानाच, दुसरीकडे भुजंगच्या कुटिल कारस्थानांना वेळीच ओळखून तुळजा आणि तिची बालटोळी गुप्तहेरांप्रमाणे भुजंगाच्या घरात शिरते. अत्यंत शिताफीने आणि धाडसाने तिथे ती अशी एक गोष्ट करतात, त्याने अलक्ष्मी आणि भुजंगाच्या संपूर्ण कथानकाला विलक्षण कलाटणी मिळते. या नंतर देवीच्या दरबारात चातुर्मासातली पुढची गुढ गोष्ट सुरू होते, ज्याचा या बालटोळीने घडवून आणलेल्या गोष्टीशी जवळचा संबंध असतो.
बालकलाकारांचा अस्सल अभिनय, लहानग्यांच्या अवखळ खोड्या आणि उत्कंठा वाढवणारे हे टप्पे यामुळे ही मालिका दररोज घराघरात पाहिली जाते आहे.
हरीचे लोणी खाण्याचे प्रेम, दहीहंडीचा हा विशेष प्रोमो आणि भुजंग-चेलप्पाच्या षडयंत्रांना बालटोळी कसे उत्तर देणार, या सगळ्या गोष्टी आगामी भागांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारे ठरत आहेत.
