प्रत्येकाच्या अंतरंगातील कृष्णतत्त्वाची जागृती व्हावी, या उद्देशाने लेखन
प्रसिद्ध लेखक आणि मार्गदर्शक नितीन राम यांचे मनोगत
पुणे – जे आपल्या अंतरंगात आहे, पण आपण सारे त्याचा बाहेर शोध घेत आहोत, अशा कृष्णतत्त्वाची जाणीवजागृती सर्वसामान्यांना व्हावी आणि अंतर्यामी वसणारे कृष्णविवर प्रत्येकाला गवसावे, या ओढीतून लेखन केले, असे मनोगत प्रसिद्ध लेखक आणि मार्गदर्शक नितीन राम यांनी मंगळवारी येथे मांडले. कृष्णतत्त्वाचा हा शोध रूपककथा, कविता आणि अनुभूतीसदृश रचनांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले.
लेखक नितीन राम त्यांच्या ‘आपण सारे कृष्ण’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. अनहद रिट्रिट आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी – गीतकार वैभव जोशी आणि प्रसिद्ध अभिनेत्री – दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते अमलताश प्रकाशनाच्या या पुस्तकाचे प्रकाशन झाले. लेखक नितीन राम यांच्यासह डॉ. अनिता राम तसेच अमलताश प्रकाशनाचे सुश्रुत कुलकर्णी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मयूर कालनी येथील बालशिक्षण शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
नितीन राम म्हणाले, ओशो आणि निसर्गदत्त महाराज या सद्गुरूंच्या कृपेने मला नवी दृष्टी मिळाली आणि जे मला उमगले, ते सर्वांपर्यंत न्यावे, या अंतःप्रेरणेने मी लेखनाकडे वळलो. आपल्या प्रत्येकाला कशाचा तरी शोध असतो, पण तो नेमका कशाचा, हे समजत नाही. गुरुकृपेने आपल्या अंतरंगातील कृष्णतत्त्व प्रकट व्हावे आणि जीवन सहज करणारा, आपल्याला सर्व अर्थांनी निश्चिंत, निर्भय करणारा बोध घडावा, हाच उद्देश आहे. संसार या संज्ञेतील खरे ‘सार’ प्रत्येकाला गवसावे, हीच प्रार्थना आहे.
मृणाल कुलकर्णी यांनी पुस्तकातील काही भागाचे वाचन केले. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील आरशात प्रत्येकाने स्वतःमधील वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न करावा आणि कृष्णतत्त्व आपल्यापाशी नेमक्या कोणत्या रूपाने वास करीत आहे, हे समजून घेण्याचा प्रवास सुरू व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजच्या काळात अशा शोधाची आत्यंतिक गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
वैभव जोशी म्हणाले, किती नेमके म्हणजे पुरेसे, हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे आपली संभ्रमावस्था कायम राहते. नितीन राम यांच्या लेखनातून स्वतःमध्ये डोकावण्याची, बहिरंगाकडून अंतरंगाकडे जाण्याची प्रेरणा मिळते. स्वतःच्या जाणीवजागृतीचे असे चैतन्यक्षण आपल्याला ओळखता यावेत, स्वतःमधील बदलांची सुरवात व्हावी, यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल आणि वाचकांचे अंतरंग उजळून टाकेल.
सुश्रुत कुलकर्णी यांनी प्रकाशकीय मनोगत मांडले. डाॅ. अनिता राम यांनी सरस्वती वंदना तसेच प्रार्थना सादर केली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद दुसाने यांनी आभार मानले.
