मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण, ही भेट राजकीय नसल्याचा दावा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यात मंगळवारी रात्री झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. मात्र, या भेटीला कोणताही राजकीय संदर्भ नसून ती केवळ प्रशासकीय विषयासाठी झाल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील यांनी सांगितले की, उरण-ईश्वरपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मालगुंडे यांना अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात अपात्र ठरविण्यात आले आहे. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे मत मांडण्यासाठी आणि या प्रकरणात मुख्यमंत्री हस्तक्षेप करावा, अशी विनंती करण्यासाठी त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली.
ही भेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही उपस्थित असल्याने या भेटीला राजकीय रंग चढला. दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये संभाव्य चर्चा किंवा भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत अंदाज व्यक्त केले जाऊ लागले.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू आहेत. पक्षाकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा मिळू शकतो किंवा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही आमदार सत्ताधारी आघाडीसोबत जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चांमुळे या भेटीकडे अधिक लक्ष वेधले गेले.
मात्र, या सर्व तर्क-वितर्कांना फेटाळत जयंत पाटील यांनी ही भेट पूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची होती आणि नगराध्यक्षांच्या अपात्रतेचा मुद्दा मांडण्यासाठीच आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे पुन्हा स्पष्ट केले.
