फेरपडताळणी नंतर तब्बल 92 लाख लाडक्या बहिणी ठरल्या दोडक्या
मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या फेर पडताळणी नंतर तब्बल 92 लाख महिला अपात्र असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. वगळण्यात आलेल्या महिलांपैकी सर्वाधिक महिला बीड जिल्ह्यातील आहेत.
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेचा मोठा लाभ निवडणुकीत महायुतीला झाल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले. तसेच तब्बल 14 हजार पुरुषांनी देखील या योजनेद्वारे हात धुवून घेतले.
हे प्रकार ओळखीला आल्यानंतर सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले. त्यामध्ये अनेक महिला अपात्र ठरल्याचे आढळून आले. त्यामुळे यापूर्वीच 80 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यानंतरही तब्बल 12 लाख महिला त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असूनही या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले. तसेच 65 वर्षापेक्षा अधिक वयाच्या साडेचार लाख महिला देखील या योजनेच्या लाभार्थी असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत.
एकट्या बीड जिल्ह्यात तब्बल 28 लाख अपात्र महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे फेरपडताळणीत आढळून आले आहे. अर्थात, ज्या महिलांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आली असतील अशा महिलांनी योग्य ते पुरावे सादर केल्यास त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल, असेही सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे.
