नितीन गडकरी यांच्या बदनामीचा भाजप नेत्यांचाच कट: संजय राऊत यांचा आरोप
मुंबई : सन 2019 मध्ये पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असलेल्या कार्यक्षम मंत्री नितीन गडकरी यांच्या बदनामी मागे बाहेरच्या कोणी नाही तर भारतीय जनता पक्षाचे नेते असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. स्वतः नितीन गडकरी यांनीच या प्रकरणी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून वस्तुस्थिती मांडावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर गडकरी यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत राहू नये, यासाठी भाजपच्या नेत्यांनीच त्यांना पुरेपूर बदनाम करण्याचा कट आखला आहे. पर्यायी इंधन म्हणून इथेनॉल वापरण्याचे धोरण गडकरी यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी राबवल्याचा त्यांचा आरोप आहे. वास्तविक गडकरी यांच्या बदनामीचा हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी देखील भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गडकरी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अशीच बदनामीची मोहीम राबवण्यात आली होती, असेही राऊत यांनी नमूद केले.
विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावरून संजय राऊत यांनी यापूर्वी संताप व्यक्त केला आहे. या भेटीवरून शिवसेना ठाकरे गट नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांनी, शरद पवार आपल्याला भेटले तर कोणाच्या पोटात दुखण्याचे काय कारण आहे, इतका कद्रूपणा बरा नव्हे, असे बोचरे विधान केले होते. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
हा कद्रूपणा नाही. तुम्ही भाजपाबरोबर गेलात याबद्दल आमचा राग नाही. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मदतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर दरोडा घातला, त्याबद्दल आमचा राग आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच पावलावर पाऊल ठेवून शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पक्ष भाजपच दावणीला बांधला, याबद्दल आमचा राग आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे मालक तुम्ही कसे होऊ शकता? शरद पवार हयात असताना त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे मालक सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे कसे होऊ शकतात, असा सवालही राऊत यांनी केला.
