शेतकऱ्यांची कर्जमाफी पडली लांबणीवर
आयकराची माहिती आल्यावरच अंमलबजावणी
मुंबई प्रतिनिधी
शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली असल्याचे राज्य सरकारनेच स्पष्ट केले आहे. लाभार्थींच्या आयकराबाबतचा तपशील केंद्राकडून मागवण्यात आला असून तो प्राप्त झाल्यावरच कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करता येईल, असे सरकारने नमूद केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेनुसार शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार रुपयांची सूट अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, आयकर भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ द्यावा की नाही, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. हा निर्णय घेण्यासाठी केंद्राकडून माहिती मागवण्यात आली आहे. ही माहिती चार ते पाच दिवसात मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कर्जमाफी मिळण्यास किमान आठवडा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागू शकतो.
आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला तर लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होणार आहे. सध्या या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कोणत्याही अटी, शर्ती न ठेवता सरसकट कर्जमाफी केली जावी, या मागणीसाठी आंदोलन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते स्थगित ठेवण्यात आले आहे. मात्र, सरकारने आता आयकराच्या मुद्द्यावर पात्रतेच्या अटीमध्ये भरच घातली आहे. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
