Sunday, August 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नाशिक – ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात

नाशिक प्रतिनिधी

शिवसेना शिंदे गटाने आता दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर राबवण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेतील सुमारे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असून त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा कोणत्याही क्षणी होऊ शकतो, अशी माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरे गटाचे नऊपैकी सहा खासदार शिंदे गटाच्या गोटात सामील झाले आहेत. त्याचा दुसरा टप्पा म्हणून शिंदे कटवण्याचा राज्यातील ठाकरे गटाचे आमदार आणि विविध महापालिकेतील नगरसेवकांवर लक्ष केंद्रित केले आहे.

ठाकरे गटाचे 14 आमदार संपर्कात असून ते शिंदे गटात येण्यास उत्सुक असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून मागील काही काळापासून सातत्याने करण्यात येत आहे. आता ऑपरेशन टायगर महापालिका पर्यंत जाऊन पोहोचणार असल्याची लक्षणे आहेत.

नाशिक महापालिकेत ठाकरे गटाचे 15 नगरसेवक आहेत. या गटाचा एक महत्त्वाचा नेता शिंदे गटाच्या गळाला लागला असून दहा ते बारा नगरसेवकही फुटण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले आहे. या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी मोठा अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचीही चर्चा आहे.

ऑपरेशन टायगरच्या धर्तीवरच शिंदे गटाने ऑपरेशन तुतारी देखील हाती घेतले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आपल्या पक्षात ओढण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, खुद्द शरद पवार यांनीच अचानकपणे विधानभवनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाला भेट देऊन त्याच ठिकाणी आपल्या आमदारांची बैठकही घेतली. त्यांच्या या कृतीतून त्यांनी एकीकडे एकनाथ शिंदे यांना तर दुसरीकडे आपल्या आमदारांना ऑपरेशन तुतारी बाबत सबुरीने घेण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिल्याचे मानले जात आहे. त्याचप्रमाणे रामरक्षा हाती घेऊन आपली हिंदुत्ववादी ओळख पुन्हा ठळक करू पाहणारे ठाकरे गटाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देखील पवार यांनी सूचक इशारा केल्याच्याही चर्चा आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading