नागरिकांना विश्वासार्ह आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी पोस्ट विभाग कटिबद्ध – प्रीती अग्रवाल
पुणे : परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत दर्जेदार, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा पोहोचविण्यासाठी पुणे डाक क्षेत्र सातत्याने कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पुणे डाक क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल प्रीती अग्रवाल यांनी केले.
भारतीय पोस्ट विभागाअंतर्गत कार्यरत असलेले पुणे डाक क्षेत्र कार्यालय हे महाराष्ट्र परिमंडळातील एक अग्रगण्य कार्यालय असून पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि सोलापूर हे चार जिल्हे याच्या कार्यक्षेत्रात येतात. येथे आपले मजबूत जाळे निर्माण करून नागरिक, सरकार आणि समाज यांच्यामधील विश्वासाचा एक सक्षम दुवा बनले आहे. विश्वास ही आमची ओळख, सेवा हा आमचा संकल्प आणि नवोपक्रम ही आमची दिशा आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पुणे येथील पोस्टमास्टर जनरल कार्यालयातील ‘चाणक्य हॉल’ येथे आयोजित विशेष पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी डाक सेवा संचालक (पुणे क्षेत्र) श्री. अभिजीत बनसोडे, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकचे प्रादेशिक प्रमुख श्री. राजेंद्र आघव, सहाय्यक डाक सेवा संचालक-1 श्री. ए. जी. पाखरे आणि सहाय्यक डाक सेवा संचालक-2, श्री. एन. के. राऊत, पुणे शहर पश्चिम विभागाचे वरिष्ठ डाक अधीक्षक श्री. एन. एस. येवला, रेल्वे मेल सर्व्हिसचे (RMS) अधीक्षक श्री. बी. पी. एरंडे आणि पुणे मुख्य टपाल कार्यालयाचे (Pune GPO) वरिष्ठ पोस्टमास्टर श्री. अमेय निमसुदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
2674 टपाल कार्यालयांचे विस्तृत नेटवर्क
यावेळी एका सादरीकरणाच्या माध्यमातून
पुणे डाक क्षेत्राशी संबंधित माहिती पत्रकारांसमोर मांडण्यात आली.
पुणे डाक क्षेत्राचा विस्तार हा अत्यंत व्यापक असून, यामध्ये एकूण 10 टपाल विभाग (अहिल्यानगर, बारामती, कराड, पंढरपूर, पुणे शहर पूर्व, पुणे शहर पश्चिम, पुणे ग्रामीण, सातारा, श्रीरामपूर आणि सोलापूर) कार्यरत आहेत. या विभागांच्या माध्यमातून 11 प्रधान टपाल कार्यालये, 474 उप टपाल कार्यालये आणि 2189 शाखा टपाल कार्यालये अशी एकूण 2674 टपाल कार्यालये शहरी, ग्रामीण आणि थेट दुर्गम भागातील नागरिकांना सेवा देत आहेत. सुमारे 4000 अधिकारी, कर्मचारी, ग्रामीण डाक सेवक आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह यांचे समर्पित मनुष्यबळ दररोज लाखो नागरिकांपर्यंत वेळेवर सेवा पोहोचवत आहे.
आधुनिक टपाल आणि लॉजिस्टिक्स सेवा
पारंपरिक टपाल सेवेसोबतच आजचा आधुनिक ग्राहक आणि व्यापारी क्षेत्राची गरज ओळखून स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल, बिझनेस पोस्ट, डायरेक्ट पोस्ट आणि एक्सप्रेस पार्सल सेवा अधिक सक्षम करण्यात आल्या आहेत. पुण्यात एक आधुनिक पार्सल पॅकिंग युनिट स्थापन करण्यात आले असून, याद्वारे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पार्सलसाठी प्रमाणित पॅकिंग सुविधा दिली जाते. तसेच, मेल मोटर सेवेच्या (MMS) 35 वाहनांद्वारे टपाल व पार्सलची वेळेवर वाहतूक केली जाते.
आर्थिक समावेशनात महत्त्वाची भूमिका आणि डिजिटल उपक्रम
टपाल विभाग हा देशातील सर्वात मोठ्या आर्थिक सेवा नेटवर्कपैकी एक आहे. पुणे डाक क्षेत्रामार्फत नागरिकांना सुरक्षित बचत योजना जसे की, बचत खाते, आवर्ती ठेव (RD), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफ (PPF) चा लाभ दिला जात आहे. यासोबतच, India Post Payments Bank (IPPB) च्या माध्यमातून ग्रामीण भागात डिजिटल बँकिंग, आधार आधारित पेमेंट (AEPS), थेट लाभ हस्तांतरण (DBT) आणि घरपोच बँकिंग सेवा उपलब्ध करून आर्थिक समावेशनाला नवी गती देण्यात आली आहे.
नागरिक-केंद्रित सेवा आणि नवोपक्रम
निवडक टपाल कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी सुलभ आधार सेवा (नोंदणी व अद्ययावत करणे) उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या सुविधेसाठी पुणे डाक क्षेत्राने अनेक आधुनिक उपक्रम सुरू केले आहेत, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस (NGPO): आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज कार्यालये.
“पोस्ट ऑफिस आपल्या दारी”: थेट नागरिकांच्या घरापर्यंत सेवांची पोहोच.
डिजिटल सक्षमीकरण: ऑनलाइन ट्रॅकिंग आणि तत्पर ग्राहक सेवा.
पुणे डाक क्षेत्राचे उद्दिष्ट केवळ टपाल वितरण करणे एवढेच नसून, आधुनिक तंत्रज्ञान आणि समर्पित मनुष्यबळाच्या जोरावर प्रत्येक नागरिकाला ग्राहक-केंद्रित, पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देणे हेच आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
