‘आई तुळजाभवानी’ मालिकेत तुळजाईच्या अलौकिक शक्तिरूपांचे होणार ‘विराट दर्शन’ !
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत आतापर्यंतचा सर्वात मोठा शक्तिरूप दर्शनाचा टप्पा सुरू होत आहे. निर्जला ते आषाढी एकादशी या अत्यंत पवित्र आणि कर्मशुद्धीच्या काळात मालिकेत ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना’ पाहायला मिळणार आहे. भुलोकावर भक्तीचा ‘चातुर्मास’ सुरू होऊ नये म्हणून पाताळदेवीने अकालमृत्यू, भय, चिंता आणि व्यसन या चार विकारांचा वापर करून एक भयानक कारस्थान रचले होते. हे संकट हाणून पाडण्यासाठी आदिमाया सज्ज झाली आणि आई तुळजाभवानीने या संकटाचा कसा निपात केला याची दैवी कथा मालिकेत सादर होणार असून दररोज रात्री ८:५० वाजता प्रेक्षकांना देवी तुळजाईच्या अलौकिक शक्तिरूपांचे ‘विराट दर्शन’ घडणार आहे.
या महासंकटातून मानवांचे रक्षण करण्यासाठी देवी तुळजाभवानी चार वेगवेगळ्या अवतारांमध्ये प्रकट होऊन केवळ चमत्कार घडवणार नाही,तर या संकटांपासून रक्षण करण्याचा बीजमंत्र देणार आहे, संकटांशी झुंजायचे बळ देणाऱ्या आई तुळजाभवानीच्या दैवी शिकवण आणि प्रेरणेचा नवा अध्याय मालिकेत या दरम्यान उलगडणार आहे. देवी भक्त एका शेतकरी कुटुंबातील चार भावांच्या गोष्टीतून उलगडणारा हा कथेचा पट प्रेक्षकांना दैवी आध्यात्मिक अनुभूती सोबतच महत्वाची जगण्याची शिकवण देणारा आहे.
सध्या आदिशक्ती समोरच्या ब्रह्मांडात ताऱ्यांचे एक अंधुक ‘दिव्य स्वस्तिक’ निर्माण झाले आहे.
मृत्यूहारिणी,भयतारिणी,चिंतानाशिनी आणि व्यसनखंडिनी या रूपात देवी तुळजा जशी जशी या चार विकारांवर निर्णायक विजय मिळवण्यात यशस्वी होईल तसे तसे हे स्वस्तिक पूर्णपणे उजळेल मात्र हा प्रवास तितकासा सोप्पा नाही.कारण या विकारांचा प्रभाव खूप मोठा आहे. तेव्हा देवी या संकटातून चारही भावांना कशी मुक्त करेल? संपूर्ण स्वस्तिक उजळण्याचा प्रवास कसा असेल आणि आगामी मंगलमयी चातुर्मासाचा आरंभ कसा होणार ? देवी यातून कोणता बोध देणार ? हे जाणून घेण्यासाठी अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना; दररोज रात्री ८:५० वाजता.
