प्रत्यक्ष पुराव्याअभावी केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास आव्हानात्मक
पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अद्याप कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समोर आलेला नसून, घटनेचे थेट चित्रण करणारे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे तपासाची संपूर्ण दिशा परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक तपासावर अवलंबून आहे.
तपासादरम्यान कोणतीही कायदेशीर किंवा प्रक्रियात्मक त्रुटी राहू नये, यासाठी पुणे पोलिस विशेष दक्षता घेत आहेत. यापूर्वी एका गाजलेल्या हत्येच्या प्रकरणात तपासातील त्रुटींमुळे आरोपीला दिलासा मिळाल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या प्रकरणात प्रत्येक पुरावा कायदेशीरदृष्ट्या भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी घटनास्थळाची डमीच्या सहाय्याने पुनर्रचना केली आहे. मात्र, अशा पुनर्रचनेला मर्यादा असल्याने त्यासोबत इतर वैज्ञानिक आणि डिजिटल पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्य संशयित सिया गोयलची पॉलीग्राफ (लाय डिटेक्टर) चाचणी घेण्याची तयारी सुरू आहे. या चाचणीचा अहवाल न्यायालयात थेट पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नसला, तरी तपासाला नवे धागेदोरे मिळू शकतात, अशी पोलिसांची अपेक्षा आहे.
तपासात मोबाइल डेटा, लोकेशन हिस्ट्री, इंटरनेट सर्च, डिलीट केलेले संदेश आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात असून, कथित कटाची साखळी उलगडण्यासाठी हे पुरावे महत्त्वाचे ठरू शकतात. तपास यंत्रणा उपलब्ध सर्व तांत्रिक आणि वैज्ञानिक साधनांचा वापर करून मजबूत पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात न्यायालय पुरावे आणि कायदेशीर प्रक्रियेला महत्त्व देते. त्यामुळे तपासातील प्रत्येक पाऊल अत्यंत काळजीपूर्वक उचलले जात असून, कोणतीही त्रुटी राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.
