अनुभवा महासोहळा स्वामींच्या गुरुरुप दर्शनाचा, पाच आठवडे, साक्षात्कार पाच दिव्य गुरुरुपांचा !
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून जुलै महिना हा ‘गुरुदर्शनाचा महिना’ म्हणून साजरा केला जाणार आहे. जुलैच्या महिन्यात सुरू होणारा हा विशेष प्रवास थेट गुरुपौर्णिमा महासोहळ्यापर्यंत रंगणार आहे. या संपूर्ण महिन्यात प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या तब्बल पाच दिव्य गुरुरुपांचे अद्भुत दर्शन घडणार आहे. यामध्ये माहुर येथे ‘श्री दत्तात्रेय’, गाणगापूर येथे ‘श्री नृसिंह सरस्वती’, तसेच शिरडीचे ‘श्री साईबाबा’, कुरवपूरचे ‘श्री श्रीपाद श्रीवल्लभ’ आणि अखेर अक्कलकोटचे स्वतः ‘श्री स्वामी समर्थ’ अशा पाच दिव्य रुपांचा साक्षात्कार होणार आहे. ह्या महिन्याच्या स्टोरी मधून भक्तांना स्वामी सांगू पाहतात – कुणालाही कुणाचं नशीब चोरता येत नाही … स्वामी ज्याच्या भाग्यातलं त्याला मिळवून देतातच’ स्वामी भक्तांसाठी हि एक अभूतपूर्व आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे, ज्यामध्ये स्वामींच्या प्रत्येक दर्शनासोबत मालिकेची मुख्य कथा अत्यंत रंजक पद्धतीने पुढे सरकणार आहे. अनुभवा महासोहळा स्वामींच्या गुरुरुप दर्शनाचा, पाच आठवडे, साक्षात्कार पाच दिव्य गुरुरुपांचा! पहा जय जय स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेचा भक्तिमय जुलै महिना २ जुलै पासून रात्री. ८:१० वा. कलर्स मराठीवर.
कावेरी ही स्वामींची निस्सीम भक्त आहे, जिचं या जगात स्वामींशिवाय दुसरं कोणीही नाही. १८ वर्षांपूर्वी तिचे चोरले गेलेले हक्काचे नशीब तिला परत देण्यासाठी खुद्द स्वामींनी तिला अक्कलकोटला येण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, परिस्थितीच्या जाळ्यात अडकलेली कावेरी या प्रवासाला कशी निघणार, हा मोठा प्रश्न आहे. या प्रवासादरम्यान तिची घुसमट संपवण्यासाठी स्वामी तिला वेगवेगळ्या माध्यमांतून मार्गदर्शन करतात. अक्कलकोटच्या दिशेने सुरू होणाऱ्या या प्रवासात कावेरीला पावलोपावली स्वामींच्या वेगवेगळ्या दिव्य गुरुरुपांचे साक्षात्कार होणार आहेत आणि प्रत्येक रुपाकडून तिला गुरुमंत्राचे एकेक अक्षर प्राप्त होणार आहे, जे तिचे जीवन बदलून टाकणार आहे.
एकिकडे अनाथ कावेरीला तिचे हक्काचे नशीब मिळवून देण्यासाठी स्वामींनी अक्कलकोटला बोलावले आहे, तर दुसरीकडे तिच्या या प्रवासात अनेक अडचणी आणि मानवी स्वार्थाचे अडथळे उभे ठाकणार आहेत. अहंकार विरुद्ध श्रद्धा असा चॅलेंज आपल्याला पाहायला मिळणार. कावेरीला दत्तक घेऊन लहानचं मोठं करणाऱ्या आणि स्वार्थी वृत्ती असलेल्या वंदनाच्या जाचातून सुटून कावेरी अखेर अक्कलकोटला कशी पोहोचणार? आणि गुरुपौर्णिमेच्या महासोहळ्यात स्वामींच्या ‘विश्वरूप दर्शनाने’ कोणते नवे सत्य समोर येणार? या सर्व गूढ प्रश्नांची उत्तरे आणि भक्तीचा हा अनोखा सोहळा येत्या जुलै महिन्यात प्रेक्षकांसाठी उलगडणार आहे.
