स्वर मिलन कार्यक्रमात शास्त्रीय संगीताबरोबरच गझल रंगात रंगले पुणेकर रसिक
पुणे : शास्त्रीय संगीताचे चाहते अशी ओळख असणाऱ्या पुणेकर रसिकांनी स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येस शास्त्रीय संगीत आणि नृत्याबरोबरच गझल गायनाचा देखील आनंद लुटला. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या नवी दिल्ली येथील प्रसिद्ध गझल गायिका मीनू बक्षी यांनी प्रथमच पुण्यात आपले गजल गायन सदर केले. निमित्त होते एमईएस सभागृहात नुकत्याच झालेल्या ‘स्वरमिलन’ या संगीत कार्यक्रमाचे. हैदराबाद येथील श्री इंद्रदेव सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य होता.
मीनू बक्षी यांनी ‘झुकी झुकी सी नजर’, ‘दयार-ए-दिल’, ‘इश्क में गैरत-ए-जज्बात ने रोने न दिया’ आणि ‘आज जाने की जिद ना करो’ या गझलांचे सादरीकरण केले. त्यांना गणेश मेहरा (की-बोर्ड), गुलाम साबीर (तबला) आणि मानस गोसावी (इसराज) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमातील आणखी एक विशेष आकर्षण ठरले ते ‘त्रिधा’ हे सादरीकरण. प्रसिद्ध तबला वादक पद्मश्री पं. विजय घाटे आणि कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर यांनी गायन, वादन आणि नृत्याचा सुरेख मिलाफ सादर केला. यामध्ये कृष्णवंदना, ‘बाजे रे मुरलिया बाजे रे’ तसेच रूपक तालातील तबला-कथक जुगलबंदी, ठाट आणि पदन्यास यांचा समावेश होता. त्यांना अभिषेक शिनकर (हार्मोनियम), सुरंजन खंडाळकर (गायन) आणि सागर पाटोकार (पढंत) यांनी साथ दिली.
कार्यक्रमाची सांगता पुण्यातील सतार वादक शाकीर अली खान यांच्या सतार वादनाने झाली. खान यांनी राग झिंझोटी सादर केला. आलाप, तोडा तसेच झपताल आणि तीनतालातील दोन बंदिशींनी त्यांनी मैफलीत रंग भरला. त्यानंतर शाकीर अली खान आणि मोहसीन अली खान यांनी राग यमनची जुगलबंदी सादर केली. अमित भूषण यांनी तबल्याची साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायरा अली हुसेन यांनी केले.
