Wednesday, October 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘याबाबत आता बोलणे योग्य नाही, पण…’; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर महादेव जानकरांचे भाष्य

मुंबई प्रतिनिधी : दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या दिवंगत नेत्याच्या राजकीय घडामोडींवर आता चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगतानाच, मुंडे भाजपमधील परिस्थितीमुळे नाराज होते आणि त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार केला होता, असे जानकर यांनी म्हटले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच दावा केला होता की, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते. त्यांच्या प्रवेशाला तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची संमतीही मिळाली होती. मात्र, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधामुळे हा प्रवेश होऊ शकला नाही, असे चव्हाण यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत पक्षप्रवेशाचा निर्णय पक्षाध्यक्ष घेतात, तर मंत्रिपदाबाबतचा निर्णय पंतप्रधान घेतात, असे स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर बोलताना महादेव जानकर यांनी चव्हाण हे चांगले आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते असल्याचे सांगितले. मात्र, गोपीनाथ मुंडे आज हयात नसल्याने त्यांच्या राजकीय निर्णयांबाबत चर्चा करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
“त्या काळात भाजपमधील परिस्थितीला कंटाळून मुंडे साहेब काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार करत होते,” असे जानकर यांनी सांगितले. मात्र, या संदर्भात नेमके काय घडले, याची आपल्याला पूर्ण माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संबंधित बैठकीला आपण उपस्थित नव्हतो, त्यामुळे त्यामागील नेमकी कारणे सांगता येणार नसल्याचे जानकर म्हणाले.
दरम्यान, जानकर यांच्या या वक्तव्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा राजकीय रंग मिळाला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याला काही प्रमाणात दुजोरा मिळाल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading