‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्ला
- शास्त्री रोडवरील आंदोलनाला निरंजन डावखरेंची भेट; ‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण नको, मुख्यमंत्र्यांपर्यंत मागण्या पोहोचवू’
पुणे : एमपीएससीच्या परीक्षापद्धतीसह विविध मागण्यांसाठी पुण्यातील अहिल्या अभ्यासिका येथे गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचा दावा डावखरे यांनी यावेळी केला.
“अधिवेशनामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सातत्याने मांडत आलो आहोत. स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत विद्यार्थ्यांच्या तीन-तीन तास बैठका झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्या असून, आणखी काही मागण्या असतील तर त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आज आंदोलनस्थळी आलो आहे,” असे डावखरे म्हणाले.
एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “ही मागणी विद्यार्थ्यांची आहे की काही लोकांना यातून स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे, हा मूळ प्रश्न आता निर्माण झाला आहे,” अशी टीका त्यांनी केली.
“एमपीएससी अध्यक्षपद हे संविधानिक पद असल्याने त्यांच्याबाबत कारवाई करण्यासाठी जी प्रक्रिया आवश्यक आहे, ती सुरू झालेली आहे. अशा परिस्थितीत अडमुठी भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, हे पाहावे लागेल,” असेही डावखरे यांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलनाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत डावखरे यांनी रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला. “पुणे हे नेहमी सर्वांना दिशा देण्याचे काम करते. पुणे बंद करण्याची भूमिका घेतली जात असेल तर पुणेकरच त्या लोकांना कसे बंद करतील, हे कळणार नाही. पुण्याशी कोणी पंगा घेऊ नये, असा माझा मैत्रीपूर्ण सल्ला आहे,” असे ते म्हणाले.
“रोहित पवार हे स्वतः आमदार आहेत. ते हक्काने मुख्यमंत्र्यांना भेटून विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडू शकतात. अधिवेशनातही हे मुद्दे उपस्थित करता येतात. आमदार म्हणून आपल्याकडे अनेक आयुधे आहेत,” असे डावखरे यांनी स्पष्ट केले.
अहिल्या अभ्यासिका येथे सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीने घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
