Wednesday, October 7, 2026
Latest NewsPUNE

रियाजातूनच कलाकाराची खरी ओळख निर्माण होते – पं. बिपुल कुमार राय

भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्काराने संतूरवादक पं. बिपुल कुमार राय सन्मानित

पुणे  : संगीत ही भारतीय जीवनपद्धतीशी आणि संस्कृतीशी घट्ट जोडलेली परंपरा असून, ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तरुण कलाकारांनी सातत्याने रियाज आणि गुरूंबद्दल समर्पणाची भावना ठेवणे आवश्यक आहे. रियाजातूनच कलाकाराची खरी ओळख निर्माण होते, असे मत सुप्रसिद्ध संतूरवादक पं. बिपुल कुमार राय यांनी व्यक्त केले. पं राय यांचा नुकताच १३ व्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा दरम्यान भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्काराने सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाउंडेशन यांच्या वतीने सदर महोत्सव औंध येथील  भारतरत्न पं भीमसेन जोशी कलामंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते पं. राय यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रुपये ३१ हजार, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. द औंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित गायकवाड, भक्ती  गायकवाड, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सन्मानाला उत्तर देताना पं. बिपुल कुमार राय यांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि भावनिक बाब असल्याचे सांगितले. “तरुण कलाकारांना अशा प्रकारे प्रोत्साहन मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. संगीताची सेवा आणि साधना करत असताना मिळणारा हा सन्मान माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे,” असे ते म्हणाले.

तरुण कलाकारांना संदेश देताना त्यांनी गुरूंबद्दल पूर्ण समर्पण आणि भक्ती ठेवण्याचे आवाहन केले. “रियाज करा, राज्य करा,” हा संदेश देत त्यांनी कलाकार कोणत्या घराण्यातून किंवा कुटुंबातून आला आहे, यापेक्षा त्याची मेहनत आणि सातत्य महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. स्वतः शेतकरी कुटुंबातून आले असूनही विविध देशांमध्ये भारताचे सांस्कृतिक राजदूत म्हणून सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याचा अनुभव राय यांनी सांगितला.

यावेळी आमदार शंकर जगताप यांनीही तरुण कलाकारांनी “रियाज करा, राज्य करा” हा मंत्र आत्मसात करावा, असे आवाहन केले. कलेच्या संवर्धनासाठी राजाश्रय आणि संस्थात्मक पाठबळ आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी कलाश्रीच्या १३ वर्षांच्या कार्याचे कौतुक केले. पं. सुधाकर चव्हाण आणि त्यांच्या टीमने संगीत तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचेही जगताप यांनी अभिनंदन केले.

भारतीय जीवनात संगीताचे असलेले स्थान स्पष्ट करताना राय म्हणाले की, जन्मापासून विविध संस्कार आणि जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये संगीताची साथ असते. त्यामुळे “संगीत हा आपला वारसा आणि ओळख आहे. प्रत्येकाने संगीत शिकावे आणि संगीत ऐकावे,” असे आवाहन त्यांनी केले. सध्याच्या ‘रिल्स’च्या युगात अल्पावधीत कलाकारांचे मूल्यमापन होत असले तरी, अशा काळात संगीत महोत्सव रसिकांना आणि कलाकारांना जोडण्याचे महत्त्वाचे काम करीत असल्याचेही पं. राय म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading