Tuesday, August 18, 2026
Latest NewsPUNE

वैष्णवी भोसले हिचा एससी प्रवर्गात एमपीएससी गट-ब संयुक्त परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक

पुणे : दीपस्तंभ फाउंडेशन- मनोबल प्रकल्पातील विद्यार्थिनी वैष्णवी भोसले हिने एमपीएससी गट-ब संयुक्त परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. वैष्णवीची स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर अर्थात राज्य कर निरीक्षक व ‘दुय्यम निबंधक (श्रेणी-१) या दोन्ही पदांसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे एससी प्रवर्गातून राज्यातील मुलींमध्ये दोन्ही पदांसाठी प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान तिने मिळवला आहे. तिच्या या यशामुळे मनोबलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मुळची धाराशिव येथील रहिवासी असलेल्या वैष्णवीने दीपस्तंभ फाउंडेशन- मनोबल प्रकल्पातील पुणे केंद्रातून वर नमूद परीक्षेसाठी प्रशिक्षण घेतले आहे. वैष्णवीचे वडील रोजंदारी मजूर म्हणून काम करतात तर आई आशा वर्कर आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने मिळवलेले हे यश उल्लेखनीय आहे.

दीपस्तंभ फाउंडेशन- मनोबल जळगाव प्रकल्पातील निवासी विद्यार्थी आशिष नागणे, हर्षला कुरले आणि आकांक्षा आडपोड यांचीही दुय्यम निबंधक म्हणून निवड झाली आहे. तर नीलम गाढवे (अनाथ) सुजीत पंडित, कांचन महाजन, अजय सोळंके, प्रसाद थोरवे, विशाखा रंगारी, वैजनाथ डुकरे आणि अमृता पानखंडे यांची एमपीएससी गट-ब संयुक्त परीक्षेत राज्य कर निरीक्षक पदासाठी निवड झाली आहे.

या यशामध्ये कमी उत्पन्न गट, अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग आहे. अजय (अनाथ), आशिष (दिव्यांग) आणि वैजनाथ डुकरे (कर्णबाधित) यांनी मिळवलेले यश विशेष प्रेरणादायी ठरले आहे.

विशेष म्हणजे सुजित पंडित आणि प्रसाद थोरवे हे दीपस्तंभ येथे अकादमीक समुपदेशक (अकॅडमी कौन्सिलर) म्हणून कार्यरत आहेत. अशा उत्तम पद्धतीचे शिक्षक आणि मार्गदर्शक आहेत.

दीपस्तंभ मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या वंचित, दिव्यांग, अनाथ आणि समाजातील विविध दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण, अभ्यासाचे पोषक वातावरण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास आणि विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या संधीचा उपयोग करत विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत आपले स्थान निर्माण केले आहे. दीपस्तंभ मनोबल प्रकल्पांतर्गत काम करणारी केंद्रे जळगाव, पुणे व नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.

संधीची समानता आणि सर्वसमावेशक शिक्षण ही केवळ संकल्पना न राहता प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्यक्ष संधी मिळणे गरजेचे आहे. परिस्थिती, सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी कोणतीही असो, योग्य मार्गदर्शन व समान संधी मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षमतेच्या बळावर यशाची उंची गाठू शकतो. दीपस्तंभ मनोबलच्या विद्यार्थ्यांचे हे यश त्याच समावेशक शिक्षणाच्या विचाराचे सार्थक उदाहरण आहे असे मत दीपस्तंभ फाउंडेशन- मनोबलचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading