बारामतीत पुन्हा शिकाऊ विमानाचा अपघात; पायलट सुखरूप
पुणे : बारामती परिसरात बुधवारी सकाळी पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. गोजुबावी गावाजवळ प्रशिक्षणासाठी उड्डाण केलेले दोन आसनी विमान अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवाने या अपघातात विमानाचा पायलट सुरक्षित बचावल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे असून नियमित सराव उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विमानाने नियंत्रण गमावल्याने ते गोजुबावी परिसरातील शेतात कोसळले. विमान कोसळल्याचा मोठा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि विमान प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पुणे ग्रामीण पोलिसांनीही या घटनेला दुजोरा दिला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, याच बारामती परिसरात काही महिन्यांपूर्वीही विमान दुर्घटना घडली होती. त्यामुळे या भागातील विमान सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्थानिक पातळीवर तांत्रिक सुविधा, धावपट्टीची स्थिती आणि हवामानाशी संबंधित बाबींची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
