Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

तटकरे, पटेल भाजपकडून लढणार – रोहित पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकारिणीत जुने स्थान न मिळाल्याबद्दल चर्चेत असलेले पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे अन्य भावी आमदार व शिवसेना शिंदे गटाचे काही असे एकूण 40 आमदार सन 2029 च्या निवडणुकीपूर्वी भाजपच्या गोटात सामील होणार हे निश्चित असून त्यासाठी भाजपने गळ टाकून ठेवला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

बारामती तालुक्यातील ढासळत्या कायदा सुव्यवस्था स्थितीबद्दल रोहित पवार यांनी व्यापारी, वकील व सामान्य नागरिकांच्या प्रतिनिधींसह पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार गट जोपर्यंत सत्तेत सहभागी आहे आणि भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही. कारण आमची भूमिका स्पष्टपणे सर्वसामान्य जनतेच्या बाजूने आणि भाजपच्या विरोधात आहे. मात्र, सध्या सत्तेत आणि भाजपा बरोबर असलेल्या आमदारांपैकी काही जणांना जनता आणि विचारसरणी यासाठी आमच्याबरोबर यायचे असेल, तर त्याबाबत पक्षप्रमुख शरद पवार निश्चितपणे विचार करतील, असेही रोहित पवार म्हणाले.

विमान अपघात प्रकरणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळणार, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात अद्यापही अक्षम्य दिरंगाई केली जात असल्याचा आरोप पत्रकारांशी बोलताना केला.

नुकतेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या शेजारी बसलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. या नायडूंनी सतत विमान अपघात प्रकरणातील व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही के सिंग यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. सुनेत्रा पवार जरी त्यांना ओळखत नसल्या तरी त्यांच्याबरोबर असलेल्या पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी त्यांना त्याबाबत जाणीव करून द्यायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त करत रोहित पवार यांनी नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना टोला लगावला.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणीदेखील फारशी व्यापक कारवाई होणार नाही. उलट भाजप नेत्यांकडून इतरांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्या प्रकरणाचा वापर केला जाईल. वास्तविक याप्रकरणी विशेष तपास पथकाने आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल आपण अभिनंदन करतो. मात्र, सध्या या प्रकरणात अडकलेल्या अथवा अडकू शकणाऱ्यांना आर्थिक देवाण-घेवाण करून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला.

बारामती तालुक्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून कायदा सुव्यवस्था धोक्यात येत आहे, याची कल्पना आपण पोलीस अधीक्षकांना दिली असून त्याबाबत पंधरा दिवसात कठोर कारवाई न झाल्यास जनतेला रस्त्यावर उतरण्याखेरीज पर्याय राहणार नाही, असेही रोहित पवार म्हणाले. तालुक्यात अमली पदार्थ, औषधांच्या माध्यमातून केली जाणारी नशा, व्यापाऱ्यांना खंडणी मागणे, भुरट्या चोऱ्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. बारामती पोटनिवडणुकीच्या वेळी लोकांनी या गंभीर प्रकाराकडे आपले लक्ष वेधले होते, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading