Wednesday, May 13, 2026
Latest NewsPUNE

श्री गणेश गीतेतील ‘भक्तीयोगा’वर प्रवचनमाला रविवारपासून

 

पुणे : भगवंताच्या भक्तीचे नेमके स्वरूप काय? भगवान कशाला भक्ती म्हणतात? याचे सविस्तर विश्लेषण मांडण्याकरिता आणि अधिकमासाच्या पावन मुहूर्तावर भगवान श्री गणेशांच्या भक्तीचा मार्ग प्रशस्त करणारा श्री गणेश गीतेतील भक्तीयोग गणेशभक्तांसमोर मांडण्याकरीता प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज हे श्री गणेश गीतेतील भक्तीयोगावर निरुपण करणार असून प्रवचनमाला सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात दि. १७ ते २३ मे २०२६ दररोज सायंकाळी ६.३० ते ८ यावेळेत ही प्रवचनमाला होणार आहे. भगवान गणेशांच्या सगुण साकार स्वरुप आणि विविध अवतारांच्या विस्मयकारी लीलांची गाथा म्हणजे श्री गणेश पुराण आहे. पुराणातील विविध कथांच्या आधारे, त्यातील कथनीय मूल्यांच्या आधारे, आपल्या जीवनाला सुंदर करण्याचा पुराण कथा श्रवण करणे हा राजमार्ग आहे. याद्वारे श्री गणेश नामाचा अद्वितीय महिमा, श्री गणेश गीतेतील कर्मयोग गणेशभक्तांसमोर मागील प्रवचनमालांमध्ये उलगडण्यात आला होता.

भगवान श्री गणेशांनी द्वापार युगातील श्रीगजानन अवतारामध्ये, माहिष्मती नगरीचे सम्राट महाराज वरेण्य यांना केलेला दिव्य उपदेश म्हणजे गणेश गीता. श्री गणेश पुराणाच्या क्रीडा खंडामध्ये हा उपदेश ग्रथित करण्यात आलेला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या गीता प्रचलित आहेत. गीता शब्दाचा अर्थच गायन करण्याची किंवा केलेली गोष्ट. माणूस गायन त्याच वेळी करू शकतो ज्यावेळी तो अत्यंत प्रसन्न, आनंदी अवस्थेत असतो. वेगळ्या शब्दात अशी अवस्था कायम टिकवण्याची भारतीय पद्धती आहे गीता.

भक्तीयोगाच्या संदर्भाने भक्ती करायची म्हणजे नेमके काय ? आपण करतो ती भक्ती योग्य होत आहे का ? आणि त्यामध्ये प्रगती होत आहे का ? भक्तीचे नेमके फळ काय? या सर्व विषयांचे सविस्तर स्पष्टीकरण स्वानंद पुंड शास्त्री महाराज करणार आहेत. तरी गणेशभक्तांनी प्रवचनमालेत मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading