दुर्गंधी आणि आरोग्याला धोका यांच्या नावाखाली मासळी बाजारात मासे कापून विकण्यास मनाई
मुंबई प्रतिनिधी
दुर्गंधी आणि आरोग्याला धोका यांच्या नावाखाली मासळी बाजारात मासे कापून विकण्यास मनाई करण्याच्या राज्य सरकारच्या कथित निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुंबईचे मूळ निवासी असलेल्या कोळी बांधवांची ही गळचेपी असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
काही मासळी बाजारांमध्ये महानगरपालिकेने मासे विक्रेत्यांना विशेषतः कोळी महिलांना मासे कापण्यास मनाई केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मासे विक्रेत्यांना सक्ती केली आहे. कोळी महिलांनी ग्राहकांना अख्खे (न कापलेले) मासे विकावेत. जर मासे कापले, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. बाजारात मासे कापल्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरते. माशांच्या अवशेषांमुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होते. तसेच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. स्वच्छता राखण्यासाठी बाजारात मासे कापू नये, असे प्रशासनाने म्हटले आहे. या निर्णयामुळे कोळी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या विषयासंदर्भात समाज माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे म्हणतात की, “कोळ्यांनी मासळी बाजारात मासे कापून विकू नये” असा निर्णय भाजपा-शिंदे गटाकडून घेतला जातो. का? तर म्हणे अस्वच्छता पसरते. मुंबईच्या खऱ्या मूळ रहिवासी म्हणजे आमच्या कोळीबांधवांच्या उदरनिर्वाहावर अशाप्रकारे गदा आणणारे तुम्ही कोण? आमचं त्या सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान आहे, आमचे कोळी बांधव मुंबईत मासे विकणार… तुमच्या नाकावर टिच्चून आणि वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने विकत आलेत त्याच पद्धतीने विकणार… मुंबई महापालिकेने कोळी बांधवांवर कारवाई करुन दाखवावीच. आम्हीही पाहून घेऊ कि मुंबईच्या खऱ्या मानकरींना कोण डिवचतं ते.
आणि एक गोष्ट स्पष्ट करा… मग चिकन घेताना पूर्ण जिवंत कोंबडी घरी घेऊन जायची का? मटन घेताना जिवंत बकरा घेऊन जायचा का? की नियम आणि “अस्वच्छता” फक्त मासळी बाजारासाठीच का?
भाजपा-शिंदे गटाच्या नेत्यांनो, तुमचे मनसुबे आम्ही ओळखून आहोत. तुमचं लक्ष्य आता कोळीबांधवांना त्रास देण्याचं आहे. कारण कोळीवाड्याच्या जमिनीवर तुमच्या मालकाचा डोळा आहे, मालकापाशी तुमची लाचारी सिद्ध करायला तुम्ही असेच निर्णय घेणार , अशी टीकाही चित्रे यांनी केली आहे.
