लुटारू दुल्हन प्रकरणाला वेगळेच वळण
कुटुंबीयांच्या खुनाचा धाक दाखवून लूट करण्यास भाग पाडल्याचा मुख्य आरोपी तरुणीचा दावा
बीड: प्रतिनिधी
तब्बल नऊ तरुणांशी विवाह करून काही दिवसातच लुटमार करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या तरुणीने, आपण हे प्रकार स्वखुशीने केलेले नाहीत तर टोळीत सहभागी असलेल्या इतर आरोपींनी आपल्या कुटुंबीयांचा खून करण्याचा धाक दाखवून आपल्याकडून हे प्रकार जबरदस्तीने करवून घेतले, असा जावा एका व्हिडिओद्वारे केला आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथील योगेश शिंदे या तरुणाची फसवणूक झाल्यानंतर हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. योगेशचे लग्न लावून देण्यासाठी एजंटनी ३ ते ३.५ लाख रुपये उकळले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच नवरी दागिने आणि रोकड घेऊन पसार झाली. या प्रकरणाचा तपास करताना ग्रामीण भागातील युवकांना अशा पद्धतीने लुबाडणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. पोलीस तपासादरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या भारती गुमास्ते या मुख्य आरोपी तरुणीने या टोळीची कार्यपद्धती पोलिसांसमोर कथन केली.
भारतीच्या सांगण्यानुसार तिचे वडील हयात नसून ती आई, पाच बहिणी यांच्यासोबत राहत होती तर तिचा भाऊ संगमनेर येथे शिक्षण घेत आहे. त्यांच्या गावातील अर्चना पाटील, तिचा मुलगा सागर, तसेच गणेश अंदुरे आणि त्याची बायको राधा अंदुरे या चौघांनी भावाच्या तसेच बहिणींच्या खुनाची धमकी देऊन आपल्याला बनावट लग्नाच्या जाळ्यात ओढले, असे तिने जबाबात सांगितले आहे.
टोळी प्रामुख्याने ग्रामीण भागातील लग्न जमत नसलेल्या तरुणांना लक्ष्य करायची. मुलीच्या गरिबीचे कारण सांगून मुलाकडच्यांकडून लाखो रुपये उकळले जायचे. लग्न झाल्यावर ही तरुणी काही दिवस सासरी राहायची आणि संधी मिळताच घरातील मौल्यवान ऐवज घेऊन पोबारा करायची. या पैशांतील मोठा हिस्सा एजंट स्वतःकडे ठेवत असत, असे सांगत लुटेरी दुल्हनला बेड्या ठोकल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे.
प्रत्येक लग्नाच्या वेळी आपण या टोळीचा पर्दाफाश करण्याची संधी शोधली. मात्र, या चौघांमुळे आपण फारसे काही करू शकलो नाही. आठव्या लग्नातील पतीने माझे इंस्टाग्राम आयडी शोधून काढले. त्या माध्यमातून त्याने आपल्याला सर्व काही खरे सांगितले तर तुला काही होऊ दिले जाणार नाही, असा विश्वास दिल्याचेही तिने सांगितले.
