Monday, May 4, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘धम्म पहाट’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे:  तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमे निमित्त ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे’ आयोजित ‘धम्म पहाट’ कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत बुद्धविचारांचा जागर पुन्हा एकदा अनुभवला. शांतता, समता आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बौद्ध संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडले.

   

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘धम्म पहाट’ कार्यक्रमाचे यंदा 20 वे वर्षे होते.  याप्रसंगी पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे, आयोजक तथा पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर.  बार्टीच्या सुचिता शिंदे , माजी नगरसेविका लता राजगुरू, नगरसेवक निलेश आल्हाट, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, रमाई स्मारकाचे प्रमुख विठ्ठल गायकवाड, बबन जोगदंड, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव दीपक म्हस्के, मिलिंद अहिरे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चेतन चोपडे यांच्या नेतृत्वाखाली कलापथकाने ‘भीमा तुझ्या पाऊल खुणा’ हा भीम गीतांचा कार्यक्रम प्रभावीपणे सादर केला. विकास साळवे, स्नेहल प्रधान या गायकांसह अन्य वादक कलावंतांनी त्यांना सुयोग्य साथ दिली. त्यांनी प्रथम नमो गौतमा, सरे रात सारी, तुज प्रथम हे नमन गौतमा, अनुसरा  शिकवण बुद्धाची, नमो बुद्धाय  म्हणे,  प्रबुद्ध हो मानावा, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, करू भीमाचे चिंतन इथे, बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, भीम भगवान माझ्या झोपडीत शान आहे, मी खासदारी का करू, दोनच राजे इथे जाहले, माझ्या भीमाच्या नावाचं, गुलमोहरी रूपाच्या भीमाला, माझाच पुनर्जन्म मी डोळ्याने पाहिला,  राजर्षी शाहू महाराजांवरील  रॅप माझा लोकराजा शाहू  आदि गीतांच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. वाडेकर यांच्या विनंतीवरून सादर करण्यात आलेल्या, पाणी वाढ ग माय, लई नाय मागत, भर माझं इवलसं गाडग, या शाहीर वामनदादा कर्डक यांच्या गाण्याने उपस्थितांच्या काळजाला चरे पडले.

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तब्बल वीस वर्षापासून धम्म पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याची माहिती उपमहापौर परशुराम  वाडेकर यांनी यावेळी दिली. महापौर मंजुषा नागपुरे ठामपणे आपल्या पाठीशी असून त्यांच्या साथीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवीन पुतळ्याची स्थापना, रमाईंच्या पुतळ्याची उभारणी, संविधान उद्यान असे अनेक प्रेरक प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्याच्या काळात जगाच्या विविध ठिकाणी युद्धज्वर पसरलेला असताना भारतात बुद्धविचारांवर आधारित संविधानामुळे शांतता आहे. युद्धात होरपळणाऱ्या जगाला तारण्याचे सामर्थ्य केवळ बुद्ध विचारांमध्ये आहे, असे वाडेकर यांनी नमूद केले.

धम्म पहाट कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली आणि समारोप धम्म पालन गाथेने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के आणि महेश अचिंतवार यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading