पीएमपीएमएल कामगार पेन्शन प्रकरणी संघटनेला न्यायालयीन लढ्यात यश; निकाल कामगार हितैषी – गोपाळदादा तिवारी
कामगार हिताचे कायदे काँग्रेस काळात; मोदी सरकारने २९ कायद्यात बदल – डॉ. कैलास कदम
पुणे : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने पीएमपीएमएल कामगार संघटना (इंटक) यांचा कामगार मेळावा काँग्रेस भवन येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र प्रदेश इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, राजगोपालचारी यांच्या नेतृत्वाखाली इंटकची स्थापना झाली आणि त्यानंतर देशात कामगार हिताचे अनेक कायदे अस्तित्वात आले. मात्र सध्याच्या मोदी सरकारने भांडवलदारांच्या दबावाखाली २९ कामगार कायद्यांमध्ये बदल केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते तथा पीएमपीएमएल कामगार संघटनेचे सल्लागार गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले की, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या संयुक्त वाहतूक व्यवस्थेसाठी पीएमपीएमएलची स्थापना करण्यात आली. मात्र कंपनी व्यवस्थापनाने निवृत्त कामगारांना पेन्शन देण्यास नकार दिल्याने संघटनेला औद्योगिक न्यायालय तसेच उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. दोन्ही न्यायालयांनी कामगारांच्या निवृत्ती वेतनाच्या मागणीस मान्यता देत कामगार हिताचे संरक्षण करणारा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पीएमपीएमएल व्यवस्थापनाला निवृत्त कामगारांना तत्काळ पेन्शन देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी तिवारी यांनी केली. कामगार हितासाठी आवश्यक असल्यास पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शासनाकडे पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मराठी भाषांतर वाचून दाखविण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, संभाजी राजे भोसले, ए. एन. अनपूर, मामा सरोदे, अशोक चव्हाण आदींनी भाषणे केली.
मेळाव्यात पीएमपीएमएलमधील अधिकारी पंकज देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत तीव्र टीका करण्यात आली. या प्रकरणामुळे संस्थेच्या आर्थिक स्थितीवर व कामगारांवर विपरीत परिणाम झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
तसेच सेवाज्येष्ठता डावलून होणाऱ्या बढती प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करण्यात आली. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय अंशदायी योजना पूर्ववत सुरू करावी, तसेच आरोग्य योजनेत शहरातील प्रमुख रुग्णालयांचा समावेश करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सरचिटणीस नुरुद्दीन ईनामदार यांनी केले, तर आभार प्रदर्शन ए. एन. अनपूर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
